- विजय साळे यांची सिडकोकडे मागणी
अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई, 23 ऑगस्ट 2018:
सिडको व्यवस्थापनाने घणसोली, खारघर, तळोजा, द्रोणागिरी आदी ठिकाणी काढलेल्या नवीन गृहनिर्माण योजनेतील घरांचा दर बाजारभावापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ही सोडत थांबवून त्या त्या ठिकाणच्या बाजारभावाप्रमाणे दर निश्चित करून नंतरच घरविक्री करावी, अशी मागणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या ब प्रभाग समितीचे सदस्य विजय साळे यांनी सिडको प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
- सिडकोने अल्प उत्पन्न आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी घणसोली, खारघर, तळोजा, द्रोणागिरी आदी ठिकाणी घरांची योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे . मात्र सिडको प्रशासनाने सर्वच ठिकाणी एकच बाजारभाव जाहीर केला आहे. तसेच प्रत्येक विभागाच्या झालेल्या विकासानुसार बाजारभाव न ठरवता थोड्या फार प्रमाणात किंमतीमध्ये बदल दाखवल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
- सिडकोच्या ज्या नोडमध्ये विकासकामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत, त्या ठिकाणी घरांच्या किंमती कमी असल्या पाहीजेत. मात्र सर्वत्र जवळपास सारखेच दर निश्चित केल्यामुळे घणसोलीसारख्या जवळच्याच नोडमधील घरांसाठी नागरिक अर्ज भरतील आणि इतर ठिकाणच्या गृहप्रकल्पांना अल्प प्रतिसाद मिळेल. त्यामुळे सिडकोने त्या त्या ठिकाणच्या बाजारभावाप्रमाणे आपल्या गृहप्रकल्पातील घरांच्या किंमती ठरवाव्यात आणि नंतरच विक्री सुरु करावी. तोपर्यंत सिडकोच्या घरांची ही सोडत थांबवावी, अशी मागणी साळे यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
===========================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- तालवाद्यांचा जादुगर -करण रामदास पाटील