अविरत वाटचाल न्यूज
मुंबई, 13 जुलै 2018:
सर्वसामान्य नागरिकांना कमी दरात तूरडाळ उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. त्यानुसार शिधापत्रिकाधारकांना आता तूर डाळ प्रति किलो 35 रुपये या दराने मिळणार आहे.
- आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2016-17 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांकडून हमी भावाने खरेदी केलेल्या तूरीची भरडाई करुन, प्राप्त झालेल्या तूरडाळीची स्वस्त दराने रास्तभाव दुकानातून विक्री करण्याचा निर्णय शासनाने यापुर्वीच घेतला आहे. या शासन निर्णयानुसार अधिकृत शिधावाटप दुकानातून तूरडाळ 55 रुपये प्रति किलो या दराने उपलब्ध करुन देण्यात आली होती. तूरडाळीचे सध्याचे बाजारातील दर लक्षात घेऊन विक्री दरामध्ये 35 रुपये प्रति किलो अशी सुधारणा करण्यात आली आहे.
मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात प्रति किलो 35 रुपये या दराने 1 किलोच्या पाकिटामध्ये सर्व अधिकृत शिधावाटप दुकानातून तूरडाळ सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना व इतर सामान्य नागरिकांना मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. डाळीचा दर्जा, त्यामधील पोषकतत्वे व किंमत या बाबींचा विचार करुन व सामान्य कार्डधारकांचे व जनतेचे हित लक्षात घेऊन तसेच तूर उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा देण्याच्या हेतूने जास्तीतजास्त शिधापत्रिकाधारक नागरीकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांनी केले आहे.
===============================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उलवे टेकडीचे सपाटीकरण