अविरत वाटचाल न्यूज
मुंबई, 25 जून 2018:
शासनाने प्लास्टिक बंदीचा लोकाभिमुख निर्णय घेतला असून हा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेच्या फायद्याचाच असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज मंत्रालयात सांगितले. तसेच प्लास्टिक वापराबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला असली तरी दैनंदिन व्यवहारात वापरण्यास परवानगी दिलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंची यादी शासनाने जाहीर केली आहे. याशिवाय न वापरता येणाऱ्या प्लास्टिक उत्पादनांचीही यादी जाहीर केली आहे.
प्लास्टिकच्या खालील बाबींवर बंदी नाही
- औषधांच्या वेस्टनांसाठी व वैद्यकीय क्षेत्रात वापरले जाणारे प्लास्टिक उदा. सिरप बॉटल, गोळ्यांच्या बॉटल आदी.
- वन व फलोत्पादन, कृषी व घनकचरा हाताळण्यासाठी तसेच रोपवाटीकांसाठी कंपोस्टेबल प्लास्टिक पिशवी.
- निर्यातीसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक.
- उत्पादनाच्या ठिकाणी उत्पादीत वस्तुंच्या वापरासाठी वापरले जाणारे प्लास्टिक वेस्टन अथवा प्लास्टिकचे आवरण.
- दुधाच्या पॅकेजिंगसाठी वापरली जाणारी 50 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीची प्लास्टिक पिशवी.
- पेट बॉटल, रेन कोट, प्लास्टिक शूज, फाईल कव्हर, प्लास्टिक चष्मा, फ्लेक्स, ग्लोज, टोपी.
- थर्माकोल बॉक्स, थर्माकोल पॅकेजिंग, ओव्हन गोणी, पिशवी, घरावर-छतावर वापरले जाणारे प्लास्टिक शिट.
- उत्पादनाच्या ठिकाणी केले जाणारे प्लास्टिकचे पॅकेजिंग जसे पाव, बिस्कीट, बेकरी उत्पादने, हस्तगृह उद्योगाच्या ठिकाणी पदार्थावर किंवा वस्तुंवर केले जाणारे प्लास्टिकचे पॅकेजिंग.
प्लास्टिकच्या खालील वस्तूंवर बंदी
- प्लास्टिक पासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्या (हॅन्डल असलेल्या व नसलेल्या)
- थर्माकोल व प्लास्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या व एकदाच वापरल्या जाणाऱ्या व फेकाव्या लागणाऱ्या वस्तू, उदा. ताट, कप्स, प्लेटस, ग्लास, वाटी, चमचे.
- हॉटेलमध्ये अन्नपदार्थ विक्रीसाठी वापरण्यात येणारी व एकदाच वापरुन फेकून देण्यात येणारी भांडी, स्ट्रॉ (प्लास्टिकचा)
- द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरले जाणारे पाऊच उदा.पिण्याचे पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक पॅक कप्स किंवा पाऊच.
- प्लास्टिक व थर्माकोलची सजावट
बिस्किट, वेफर्स,बेकरी पदार्थ हे प्लास्टिकच्या वेस्टनात दिले जातात. आज त्यांच्यासाठी पर्याय उपलब्ध नाही. त्यांना अशा प्लास्टिकचे रिसायकलिंग कसे करणार, या बाबतचा प्रस्ताव सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. उत्पादनाच्या ठिकाणी वस्तू पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक – जसे हस्त-गृह उद्योगांकडून होणारे पॅकेजिंग व ब्रॅन्डेड पॅकेजिंगकरिता उत्पादकांद्वारे वापरण्यात येणारे प्लास्टिक यावर बंदी नाही. पॉलिथिन, नॉनओव्हन पिशव्यावर बंदी असून त्याचे उत्पादन थांबविण्याच्या सूचना उत्पादकांना दिल्याचे कदम यांनी सांगितले.
गणपती उत्सवासाठी थर्माकोलला परवानगी ?
गणपती उत्सव, लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सजावटीसाठी थर्माकोलचा वापर होतो. थर्माकोलचे विघटन होत नसल्याने त्याचे गंभीर परिणाम पर्यावरणावर होत आहेत, म्हणून थर्माकोलवर बंदी घातलेली आहे. तरीही गणपती उत्सवासाठी थर्माकोल वापरावर तात्पुरती परवानगी देण्याबाबत उच्चस्तरीय समिती निर्णय घेईल, असेही कदम यांनी यावेळी सांगितले.
=========================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- स्पंदना- महिला लघुउद्योजकांसाठी व्यासपीठ