युरोपीयन फिल्म फेस्टिव्हल यंदा भारतात

  • 11 शहरांमध्ये 24 चित्रपट दाखवले जाणार

अविरत वाटचाल न्यूज

नवी दिल्ली, 15 जून 2018

युरोपीय समुदाय चित्रपट महोत्सवाचे आयोजन यंदा भारतात होत असून 18 जूनला नवी दिल्लीतल्या सिरीफोर्ट ऑडीटोरियममध्ये या महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. या महोत्सवात 23 युरोपीय देशांमधले 24 चित्रपट रसिकांना बघायला मिळतील. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील चित्रपट महोत्सव संचालनालयाने या चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. 24 जूनपर्यंत हा महोत्सव असणार आहे. देशभरात महत्त्वाच्या 11 शहरांमध्ये युरोपीय चित्रपट दाखवले जातील.

या शहरांमध्ये पुणे आणि गोव्याचाही समावेश आहे. चित्रपट क्षेत्रातले नामवंत प्रेक्षक आणि विद्यार्थ्यांना या महोत्सवादरम्यान विविध प्रसिद्ध युरोपियन निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. हे सर्व कलावंत महोत्सवाच्या काळात भारतातल्या 11 शहरांमध्ये जाणार आहेत. मराठी अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी लुक्झेमबर्गच्या एका चित्रपटात काम केले असून त्यांचा चित्रपटही या महोत्सवादरम्यान गोव्यात दाखवला जाणार आहे. स्लोव्हाकियाचा पुरस्कारप्राप्त चित्रपट लिटील् हार्बरने या महोत्सवाची सुरुवात होणार आहे.