- माध्यमिक विद्यालय दिघा, दिवाळे या शाळांचा निकाल 100 टक्के
- इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्राचा निकालही 100 टक्के
अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई, 8 जून 2018:
मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परिक्षेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या 17 माध्यमिक शाळांचा सरासरी निकाल 88.99 टक्के लागला आहे. या वर्षीही महानगरपालिकेच्या शाळांमधून 2116 विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती. माध्यमिक विद्यालय दिघा, दिवाळे या दोन शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
माध्यमिक शाळा, नेरूळचा वैष्णव गंगाराम कोंडाळकर हा विद्यार्थी 94.60 टक्के संपादन करुन नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये सर्वाधिक गुण संपादन करणारा विद्यार्थी ठरला आहे. माध्यमिक शाळा, करावे येथील रिश्वकुमार रविंद्र झा हा विद्यार्थी 92.60 टक्के गुण संपादन करुन महापालिका शाळांमध्ये व्दितीय तर पुनम पांडुरंग शिंदे ही माध्यमिक शाळा, सेक्टर 7, कोपरखैरणे ची विद्यार्थिनी 90.80 टक्के गुण प्राप्त करुन तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
सानपाडा शाळेचा – 95.45 टक्के, वाशी – 95.31 टक्के, शिरवणे – 94.24 टक्के, घणसोली – 94.04 टक्के, नेरुळ – 93.22 टक्के, कोपरखैरणे से. 7 – 92.98 टक्के, करावे – 92.85 टक्के, ऐरोली – 90.17 टक्के, तुर्भे गांव – 89.39 टक्के, से. 5 कौपरखैरणे – 83.77 टक्के, राबाडा – 83.33 टक्के, खैरणे – 82.89 टक्के, महापे – 81.13 टक्के, तुर्भे स्टोअर – 75.92 टक्के, श्रमिक नगर – 72.00 टक्के याप्रकारे निकाल लागला आहे.
महानगरपालिकेच्या इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्राचा निकाल यावर्षीही 100 टक्के लागलेला आहे. केंद्रातील सलाह मुकादम या कर्णबधीर विद्यार्थ्याने 80 टक्के गुण संपादन केले असून प्रदिप चौधरी या विद्यार्थ्याने 74 टक्के तसेच सुर्या पणीकर या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्याने 79 टक्के गुण प्राप्त केले आहेत. इ.ची.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्रातील सुधार उद्देशक वर्गांमध्ये पूर्ण वेळ शिक्षण घेऊन सर्वसामान्य शाळेतून परिक्षा दिलेल्या अध्ययन अक्षम दिव्यांग प्रवर्गातील केतन शर्मा या विद्यार्थ्याने 85 टक्के तसेच जिशान जेसानी या विद्यार्थ्याने 74 टक्के गुण संपादन केले आहेत.