अविरत वाटचाल न्यूज
मुंबई,7 जून 2018:
भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस महाराष्ट्रात पावसाचा व्यक्त केलेला अंदाज खरा ठरत असल्याचे दिसत असून आज सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडू लागला आहे. आजपासून 11 जूनपर्यंत राज्यात विशेषतः कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांत मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. त्याशिवाय कर्नाटकातील किनारपट्टीचा भाग, गोवा या भागांतही उद्या मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्ती निवारण कक्षाने केले आहे.
दरम्यान 9 तारखेला रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्हात जोरदार आणि 10,11 तारखेला मुंबई तसेच कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत असणा-यांनी आपतकालीन परिस्थितीत 1916 या क्रमांकावर तर मुंबईबाहेरील नागरिकांनी 1077 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आले आहे.
मोसमी वारे महाराष्ट्रात पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून तेलगांना, आंध्र प्रदेशमध्ये पुढील 48 तासांत हे वारे सक्रीय होतील. महाराष्ट्राचा उर्वरित भाग, गुजरातचा काही भाग, मध्य प्रदेशचा दक्षिणेकडील भाग, छत्तीसगड, ओडीसा, पश्चिम बंगाल, सिक्मीम, या प्रदेशांमध्ये 9 ते 11 जूनदरम्यान मान्सूनच्या वाटचालीसाठी प्रतिकूल परिस्थीती असणार आहे.
कर्नाटकची किनारपट्टी, गोवा, महाराष्ट्र या राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 10 जूनपर्यंत पावसाची ही परिस्थीती कायम राहणार आहे. या दरम्यान 40-50 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर 8 ते 12 जून दरम्यान कोकण आणि गोवा या भागांमध्ये ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे असण्याची शक्यता आहे. पुढच्या 48 तासांमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
इतर बातम्यांचाही मागोवा…
- स्पंदना- महिला लघुउद्योजकांच्या उत्पादनांना व्यासपीठ
- न्हावा शेवा -शिवडी ट्रान्सहार्बर लिंक रोड