उद्यापासून मुसळधार पावसाचा अंदाज

  • ७ ते ११ जून या काळात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता
  • कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये दक्षतेचा इशारा

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 6 जून 2018:

भारतीय हवामान खात्याने पुढील सहा दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त केला असून उद्या, 7 जून ते 11 जून या काळात राज्यात विशेषतः कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांत मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या असून नमागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्ती निवारण कक्षाने केले आहे.

 

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 7 जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार व काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

  • 8 जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची व अतिवृष्टीची शक्यता असून रायगड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

 

  • 9 जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची व अतिवृष्टीची शक्यता आहे.

 

  • 10 व 11 जून रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुंबई व नजिकच्या परिसरांसह बहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस व अतिवृष्टीचा अंदाज आहे.

 

नागरिकांनी घ्यावयाची काळजी

  • मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा.
  • घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.
  • अति मुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत प्रवास टाळा.
  • घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची, रेल्वे व रस्ते  वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करुन घ्या.
  • पावसात विजा चमकताना झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तूपासून दूर रहावे. अशावेळी पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.
  • आपत्कालीन स्थितीमध्ये मदतीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये 1077 या टोल फ्री आपत्ती व्यवस्थापन क्रमांकावर संपर्क साधावा.
  • मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या टोल फ्री आपत्ती व्यवस्थापन क्रमांकावर संपर्क साधा.
  • हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imd.gov.in या संकेतस्थळावरुन घ्यावी.
  • कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका.  कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करुन  घ्यावी.

इतर बातम्यांचाही मागोवा…

  • न्हावा शेवा- शिवडी ट्रान्सहार्बर लिंक रोड

 

  • स्पंदना- महिला लघुउद्योजकांच्या उत्पादनांसाठी व्यासपीठ