- एक महिन्यात प्रक्रिया सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
अविरत वाटचाल न्यूज
मुंबई, 5 जून 2018:
राज्यातील सर्व गाव नमुना नंबर सातबारा व फेरफार नोंदी नागरिकांना सुरळीतपणे व विनाअडथळा मिळावेत यासाठी ही कागदपत्रे ‘क्लाऊड’वर ठेवावीत. त्यासाठी आराखडा तयार करून एक महिन्यात त्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
डिजिटल सातबारा उताऱ्यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सूचना केल्या.
राज्यातील सर्व सातबारा उतारे व फेरफार नोंदी या ऑनलाईन ठेवण्यात येत आहेत. हे ऑनलाईन झालेले सातबारा उतारे स्थानिक सर्व्हर व स्टेट डेटा सर्व्हरवर ठेवण्यात आले आहेत. सातबारा उताऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे हे सर्व उतारे ‘क्लाऊड’वर ठेवण्यात यावेत. यासाठी राज्य शासनाने ‘क्लाऊड’ तंत्रज्ञान वापराचे धोरण तयार केले आहे. ई फेरफार व डिजिटल सातबारा प्रकल्प सुरळीत चालण्यासाठी सर्व कागदपत्रे ही क्लाऊड तंत्रज्ञानाचा वापर करून साठविणे आवश्यक आहे.
त्यासाठी ही कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यासाठी आराखडा तयार करावा अशाही सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.