- 1 लाख 5 हजार 679 कर्मचाऱ्यांना होणार लाभ
अविरत वाटचाल न्यूज
मुंबई, 1 जून 2018:
एसटी कर्मचाऱ्यांसाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज एसटीच्या 70 व्या वर्धापन दिनी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 4 हजार 849 कोटी रुपयांची वेतनवाढ केली असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे 32 ते 48 टक्के इतकी भरीव वाढ होणार आहे. या पगारवाढीचा राज्यातील 1 लाख 5 हजार 679 एसटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज दिली.सह्याद्री राज्य अतिथीगृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस खासदार अरविंद सावंत, आमदार भाई जगताप, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल उपस्थित होते.
वेतन करार करण्याबाबत एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेशी आपण मागील कित्येक दिवसांपासून वाटाघाटी करीत आहोत. पण महामंडळाने सुचविलेल्या चांगल्या प्रस्तावांनाही संघटनांनी नकार दिला. मागील सरकारच्या काळात १५ वर्षात वेतन करार करताना एसटी कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. त्या अन्यायाचे निराकरण करण्याचा प्रयत्न आपण केला. आतापर्यंत झालेल्या सगळ्या करारांपेक्षाही जास्त रकमेच्या वेतनवाढीची आज आपण घोषणा करीत असल्याचे रावते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मान्यताप्राप्त कर्मचाऱ्यांसमवेत करावयाचा करार सध्या न्यायालयीन प्रक्रियेत आहे. याचा निकाल लागण्यास किती दिवस लागतील याची माहिती नाही. तोपर्यंत कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखणे हा त्यांच्यावर मोठा अन्याय असेल. त्यामुळे वेतन कराराची प्रतिक्षा न करता आपण ही वेतनवाढ जाहीर करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.
२.५ हजार ते १२ हजार इतकी वेतनवाढ
- आजच्या वेतनवाढीत कनिष्ठ वेतनश्रेणीवर अनुक्रमे ३ व ५ वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी भरघोस वेतनवाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार या कर्मचाऱ्यांच्या वेतनात आता किमान २, ५८१ रुपये ते कमाल ९,१०५ रुपये इतकी वाढ होणार आहे.
- आज रोजी नियमित वेतनश्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात आता ३,६९२ रुपये ते १२,०७१ रुपये इतकी वाढ होईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
भत्त्यांमध्येही भरघोस वाढ
- एसटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध भत्त्यांमध्येही भरघोस वाढ जाहीर केली आहे. त्याचा आर्थिक भार प्रतिवर्षी 250 कोटी रुपये इतका आहे.
- हजेरी प्रोत्साहन भत्ता (42 दिवसांसाठी) आता 180 रुपयांवरुन 1 हजार 200 रुपये इतका वाढविण्यात आला आहे.
- पूर्वीचा 14 ते 50 रुपयांपर्यंत धुलाई भत्ता आता सरसकट 100 रुपये करण्यात आला आहे.
- 11 व 13 रुपयांचा रात्र पाळी भत्ता आता अनुक्रमे 35 व 45 रुपये इतका करण्यात आला आहे.
- साधारण ठिकाणी रात्रवस्ती भत्ता हा फक्त ४ रुपयांवरून ७५ रुपये इतका करण्यात आला आहे.
- जिल्हा ठिकाणी असलेला रात्र वस्ती भत्ता हा 11 रुपयांवरुन 80 रुपये
- विनिर्दीष्ठ ठिकाणी असलेला 15 रुपयांचा रात्रवस्ती भत्ता आता 100 रुपये करण्यात आल्याची घोषणा रावते यांनी केली.
थकबाकी 48 समान हप्त्यांमध्ये देणार
- सुधारित वेतननिश्चिती प्रशासकीय कामांच्या अधिन राहून तात्काळ लागू करण्यात येईल. परंतु, 1 एप्रिल 2016 ते 30 जून 2018 या 26 महिन्यांच्या थकबाकीची रक्कम 1 हजार 197 कोटी रुपये ही 48 समान हफ्त्यांमध्ये अदा करण्यात येईल.
- कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढ अमान्य असल्यास प्रशासनाकडे तसे पत्र 7 जून 2018 पर्यंत देणे आवश्यक आहे.
- ज्यांना ही वेतनवाढ मान्य नाही त्यांच्यासाठी महामंडळाने अन्य पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. अशा कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्यास चालकाकरिता 20 हजार रुपये व वाहकाकरिता 19 हजार रुपये इतक्या ठोक वेतनावर 5 वर्षासाठी त्वरीत कंत्राटी पध्दतीने नोकरी दिली जाईल.दरवर्षी 200 रुपये वेतनवाढ करण्यात येईल, असेही रावते यांनी यावेळी जाहीर केले.
- मान्यताप्राप्त संघटनेस ही वेतनवाढ मान्य असल्यास महामंडळाच्या प्रशासनाशी करार करण्यासाठी मुभा राहील, असे ते म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी विविध योजना
- एसटी महामंडळातील कामगारांच्या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या पाल्यांसाठी ‘सावित्रीबाई जोतिबा फुले शिष्यवृत्ती योजना’ सुरु करण्यात येत असून, त्यांच्या शिक्षणासाठी प्रति महिना 750 रुपये रक्कम देण्याचे निश्चित केले आहे.