विजेचा लपंडाव आठवडाभर चालणार ?

  • महापारेषणच्या कळवा केंद्रात मोठा बिघाड
  • महावितरणच्या ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता

अविरत वाटचाल न्यूज

ठाणे,1 जून 2018:

महापारेषणच्या ४०० के.व्ही. ग्रहण केंद्र कळवा या उपकेंद्रात दिनांक 1 जूनच्या मध्यरात्री दीड वाजता ६०० एम.व्ही.ए.चे रोहित्र युनिट-२ मध्ये बिघाड होऊन आग लागल्यामुळे रोहित्र-१च्या केबलचे मोठे नुकसान झाले आहे. ही दोन्ही युनिट दुरूस्तीसाठी आठवड्यापेक्षा अधिक काळ लागणार असल्याचे आढळून आले आहे,त्यामुळे विजेचा लपंडाव आता आठवडाभर चालण्याची टांगती तलवार महावितरणच्या ग्राहकांच्या डोक्यावर आहे. दरम्यान ऐन उकाड्यात विजेची मागणी प्रचंड वाढल्यामुळे सक्तीच्या लोडशेडींगला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावरही होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

  • महापारेषणला युनिट-१दुरुस्त करण्यास सुमारे सात दिवस लागणार आहेत.
  • रोहित्र-२ चालू करण्यास सुमारे ३०ते ४० दिवस लागण्याची शक्यता आहे.

महापारेषणच्या या केंद्रातून वीजपुरवठा केला जाणारे भाग

  1. महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडलातील ठाणे मंडलाअंतर्गत समतानगर, पाचपाखाडी, रहेजा कॉम्प्लेक्स, मेंटल हॉस्पिटल परिसर, कशिश पार्क, ल्युईसवाडी, संभाजीनगर, गणेशावाडी, सिद्धेश्वर तलाव, मखमली तलाव, नवपाडा, साकेत, तारांगण, राबोडी, कोपरी,विटावा, उथळ सर , कोर्ट नाका, वृंदावन, माजी वाडा, बालकुंब, खोपट, पॉवर हाऊस, कळवा,मुलुंड(पु.वप.) इ.

 

  1. वाशी मंडलाअंतर्गत पावणे एमआयडीसी, तुर्भे एमआयडीसी, बोनकोडे, नेरूळ, पामबीच, खारघर, कामोठे, सानपाडा, सीबीडी बेलापूर, उलवे, सी वूड, शिरवणे एमआयडीसी, घडलीय केमिकल इ. या परिसरास वीज पुरवठा होतो.  

 

विजेची मागणी वाढल्यास सध्या चालू असलेल्या यंत्रणेवर अधिकचा भार येऊन यंत्रणेत बिघाड होण्याची शक्यता असते. म्हणून मागणी व पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याकरीता महापारेषण व महावितरणकडून विजेचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक भागात सक्तीचे लोडशेडींग करण्याची पाळी महावितरणवर येण्याची शक्यता  आहे. महावितरण व महापारेषणचे अधिकारी व कर्मचारी तांत्रिक अडचण लवकरात लवकर दुरुस्त करण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.