मान्सून केरळमध्ये दाखल

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 29 मे 2018:

अरबी समुद्राच्या दक्षिण भागापर्यंत पोहोचलेला मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला आहे. उद्यापर्यंत हे मोसमी वारे कर्नाटकात दाखल होतील अशी शक्यता आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा 3 दिवस अगोदर मान्सून केरळात दाखल झाला आहे. पुढच्या 8 दिवसांत कोकणात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आज, नैऋत्य मान्सून दक्षिण पूर्वच्या उर्वरित भागांमधून पुढे जात आहे. अरबी समुद्र, कोमोरिन – मालदीव क्षेत्र, संपूर्ण लक्षद्वीप, केरळचे बहुतांश भाग, काही तामिळनाडूतील काही भाग आणि नैऋत्य, मध्य व पूर्वोत्तर क्षेत्रातील काही भागात मान्सूनचे मोसमी वारे दाखल झाले आहेत.

केरळमध्ये हवामान विभागाने लावलेल्या 14 मॉनिटरिंग स्टेशन्समध्ये 60 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. मागील 3-4 दिवसांपासून केरळमध्ये पाऊस पडत आहे. सध्या तरी नैऋत्य मान्सूनसाठी अनुकूल वातावरण आहे. मध्य अरबी समुद्र, केरळचा उर्वरित भाग, कर्नाटक , पूर्व मध्य आणि ईशान्येकडील बंगालच्या उपसागराचा काही भागात पुढील 48 तासांत मान्सून सक्रीय होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.