- कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक
- प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
अविरत वाटचाल न्यूज
मुंबई, 24 मे 2018 :
विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारीसाठी निरंजन डावखरे यांची केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस केली असून ते निवडणुकीत निश्चित विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला तर निरंजन डावखरे यांच्या विजयामुळे कोकणात भाजपाला बळकटी मिळेल, असे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले.
निरंजन डावखरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. रावसाहेब पाटील दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड आणि आ. प्रसाद लाड, भाजपा ठाणे विभाग अध्यक्ष खा. कपिल पाटील, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये व अतुल शाह तसेच आ. अतुल सावे व जगदीश मुळीक उपस्थित होते. यावेळी अकोल्याचे नगरसेवक गोपी महादेवराव ठाकरे यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निरंजन डावखरे यांचे वडील वसंत डावखरे लोकप्रिय व अजातशत्रू नेते होते. त्यांनी तीन दशके काम केले. तीच परंपरा निरंजन डावखरे चालवत असून ठाणे – कोकण भागातील ते धडाडीचे नेते आहेत. गेली सहा वर्षे विधान परिषद सदस्य म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची शिफारस केंद्रीय नेतृत्वाकडे करू. केंद्रीय समितीकडून त्यांच्या नावाला मान्यता मिळेल व आगामी निवडणुकीत ते चांगल्या मतांनी निवडून येतील.
- दानवे म्हणाले की, निरंजन डावखरे यांना भाजपामध्ये प्रवेश देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांमुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपामध्ये प्रवेश करण्याची त्यांची इच्छा होती. भाजपा एकामागोमाग निवडणुका जिंकत आहे. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातही निरंजन डावखरे यांच्या उमेदवारीने भाजपाचा विजय निश्चित असून त्यामुळे कोकणात भाजप अधिक बळकट होईल.
- निरंजन डावखरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाचे काम चालू आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आपण भाजपामध्ये प्रवेश करत आहे.