अविरत वाटचाल न्यूज
मुंबई, 23 मे 2018:
बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या नालेसफाई कामांची महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी उप महापौर हेमांगी वरळीकर, सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे, शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्यासमवेत पूर्व उपनगरांत 23 मे रोजी संयुक्त पाहणी केली. नाल्यांतून काढण्यात आलेला गाळ लवकरात लवकर उचलून निर्धारित केलेल्या ठिकाणी नेण्यात यावा, अश्या सूचनाही महापालिका प्रशासनाला त्यांनी यावेळी केल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादी पक्षाच्या गटनेते राखी जाधव, नगरसेविका, निधी शिंदे,आशा कोपरकर, नगरसेवक रामदास कांबळे यांच्यासह उप आयुक्त (परिमंडळ ६) रणजीत ढाकणे, संबंधित विभागातील सहाय्यक आयुक्त, उप प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) विनोद संखे आदी उपस्थित होते.
यावर्षीदेखील महापालिका प्रशासनाकडून नालेसफाई करताना नाल्यांमधून मोठ्या प्रमाणावर गाळ काढला जात आहे. काही ठराविक नाल्यांची सफाई न करता संपूर्ण मुंबईतील नालेसफाई झाले पाहिजे तसेच काढलेला गाळ साचून न ठेवता तो गाळ निश्चित ठरलेल्या ठिकाणी टाकण्यात यावा अशी सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला केली. कंत्राटदार याकामी कुचराई करीत असेल तर त्याला दंड आकारुन तसेच त्याला नोटीस बजावून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी. मुंबईची भौगोलिक परिस्थिती आणि सखल रचना पाहता जोरदार पाऊस आणि समुद्राची भरती हे एकाचवेळी घडले तर संभाव्य पूरस्थिती निर्माण होते. यामध्ये मुंबईकर नागरिकांचे हाल होऊ नये तसेच या परिस्थितीवरही पालिका प्रशासनाने उपाययोजना करुन मुंबईकरांचे जीवन सुरक्षित करावे याची खबरदारी आम्ही नाल्यांची पाहणी करुन घेत आहोत, असे महापौरांनी यावेळी सांगितले.
एमटीएनएल ब्रिज, बीकेसी येथील मिठी नदीपासून या पाहणी दौऱयाचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर ‘ एन’ विभाग येथील लक्ष्मीबाग नाला, ‘ एस’ विभागातील उषा नगर नाला, बॉम्बे ऑक्सीझन नाला, ब्रांउड्री नाला, एम /पूर्व विभागातील मानखुर्द नाला, देवनार नाला, आदी नाल्यांची यावेळी पाहणी करण्यात आली.