(प्रातिनिधिक फोटो)
- महाराष्ट्र शासन-टाटा ट्रस्ट्स इंटर्नशिप उपक्रमासाठी भरती
अविरत वाटचाल न्यूज
मुंबई, 24 मे 2018:
राज्य शासनाच्या विविध विभागात सक्षम मनुष्यबळ सातत्याने विकसित करण्याकरिता राज्य शासनाने टाटा ट्रस्ट्सच्या सहकार्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकरिता आंतरवासिता (इंटर्नशिप) उपक्रमाची आखणी केली आहे. यात राज्य शासन आणि टाटा ट्रस्टस् यांच्याकरिता ५ उमेदवार ११ महिन्यांसाठी मानधन तत्वावर काम करणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर २६ मे २०१८ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात, असे राज्य शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
- या उमेदवारांची निवड मुलाखत घेऊन होईल. राज्य शासन आणि टाटा ट्रस्टस् यांच्या संयुक्त प्रयत्नाने अंमलात आणण्यात येणारे उपक्रम लोकांपर्यंत अभिनव पद्धतीने पोहोचविण्याचे काम निवडण्यात आलेल्या उमेदवारांना सोपविण्यात येणार आहे.
- या उपक्रमात निवडण्यात आलेल्या उमेदवारांना प्रती महिना २० हजाराहून अधिक मानधन देण्यात येईल. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात येईल.
या कार्यक्रमांतर्गत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत.
१. समाजमाध्यमांसाठी संहिता लेखक -२
पात्रता- पदवी, सोशल मीडियाशी संबंधित लघु अभ्यासक्रमास प्राधान्य
२. माहिती तंत्रज्ञान सहाय्यक -१
पात्रता- बीएस्सी, एमएस्सी, एमटेक, बीई (आयटी) (सीएस)
३. व्हिडिओ ॲनिमेटर – १
पात्रता- बारावी + ॲनिमेशन विषयातील पदविका
४. संगीत संयोजक -१
पात्रता- बारावी + संगीत विषयातील पदविका (की-बोर्डचे तसेच संगीतविषयक सॉफ्टवेअरचे ज्ञान आवश्यक )
अर्जदाराने पुढील बाबींची पूर्तता करणे आवश्यक
- अर्जदाराने आवश्यक पदवी/पदविका किमान ५५ टक्के गुणांसह अथवा ए ग्रेडसह प्राप्त केलेली असावी.
- संगणक आणि सोशल मीडिया यांचे ज्ञान आणि एमएस ऑफिस तसेच ज्या विषयात काम करण्यासाठी अर्ज केला आहे त्या विषयातील आवश्यक संगणक प्रणालीची माहिती असणे आवश्यक.
- ३१ मार्च २०१८ रोजी अर्जदाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- संबंधित क्षेत्रातील अनुभव असणाऱ्या तसेच शासन किंवा शासनाशी संबंधित प्रकल्प किंवा योजनेतील अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- हा कार्यक्रम म्हणजे शासकीय सेवा नसेल. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारे कोणतेही लाभ उमेदवारांना देण्यात येणार नाहीत.
वेळापत्रक
- १२ ते २६ मे २०१८ – अर्ज मागविणे
- २६ ते २८ मे २०१८ – अर्जांची छाननी
- ३१ मे – मुलाखत कार्यक्रम
- १ जूनपासून उमेदवारांना रुजू करून घेणे