वाशी, बेलापूर येथे सफाई कर्मचा-यांची वैद्यकीय तपासणी

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 23 मे 2018:

साफसाफाई कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी बेलापूर कार्यक्षेत्रामध्ये सेक्टर-48 येथील नागरी आरोग्य केंद्रात बेलापूर कार्यक्षेत्रातील सर्व कंत्राटी साफसफाई कामगारांच्या वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीसफाई कामगारांना आपले आरोग्य चांगले रहावे यादृष्टीने घ्यावयाची काळजी व आरोग्याविषयक सूचना देण्यात आल्या.

 

  • या कार्यक्रमाप्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके, बेलापूर विभाग कार्यालयातील स्वच्छता अधिकारी सुभाष म्हसे, स्वच्छता ‍निरीक्षक ‍ कविता खरात, पवन कोवे, उपस्वच्छता निरीक्षक मिलिंद तांडेल, विजय चौधरी, नागरी आरोग्य केंद्रामधील अधिकारी व कर्मचारी तसेच स्वच्छग्राही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

  • वाशी विभाग कार्यालय क्षेत्रातील जुहूगाव नागरी आरोग्य केंद्र येथे वाशी विभाग कार्यक्षेत्रामधील सर्व कंत्राटी साफसफाई कामगारांकरिता वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आरोग्याविषयक सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या वर्मा, आरोग्य निरीक्षक देशमुख, वाशी विभागामधील स्वच्छता अधिकारी विनायक जुईकर, स्वच्छता निरीक्षक  जयश्री आढळ, उप स्वच्छता निरीक्षक मनीष सरकटे, अजित तांडेल, भुषण सुतार तसेच, स्वच्छाग्रही मोठया प्रमाणात उपस्थित होते.

 

‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’ मध्ये घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात देशातील सर्वोत्तम शहर म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या झालेला नावलौकिक आगामी काळात सर्वांच्या सहयोगाने अधिक उंचावण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गतकेंद्रीय स्तरावरून प्राप्त कॅलेंडरनुसार विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनानुसार विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत  आहे.त्यानुसार दैनंदिन स्वच्छतेत साफसफाई कामगारांची सर्वात महत्वपूर्ण भूमिका लक्षात घेऊन मे महिन्यात शहरातील सर्व कंत्राटी साफसफाई कामगारांचा “हमारे स्वच्छ सैनिक” म्हणून सन्मान करण्यात येत आहे.