खबरदारीसाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुरु
अविरत वाटचाल
मुंबई, 22 मे 2018
केरळमध्ये उद्भवलेल्या निपाह विषाणुच्या आजारासारखा एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळलेला नाही. याबाबत घाबरण्यासारखी कोणतीही परिस्थिती राज्यात नाही, पण तरीही या आजारासंदर्भातील काही लक्षणे आढळल्यास रुग्णांनी डॉक्टरांशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले आहे. खबरदारीचे उपाय म्हणून मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयासह राज्यातील प्रमुख शासकीय रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष (isolation ward) सुरु करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. सावंत यांनी आज मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. सावंत यांच्या उपस्थितीत यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली, त्यात या आजारासंदर्भात घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजना निश्चित करण्यात आल्या, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सावंत बोलत होते. बैठकीला सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. संजिवकुमार, आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे, संसर्गजन्य रोग प्रतिबंधक समितीचे सदस्य डॉ. ओम श्रीवास्तव, अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतिश पवार आदि उपस्थित होते.
रुग्णालये, डॉक्टर तसेच नर्सेस यांनी या आजारासंदर्भात घ्यावयाची काळजी आणि करावयाच्या उपाययोजना यासंदर्भातील मार्गदर्शिका राज्यातील सर्व रुग्णालयांना पाठविण्यात येत आहे. निपाह विषाणू आजारात विशेषत: ताप, अंगदुखी, डोकेकुखी, झोपाळलेपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात. विशेषत: केरळ भागातून प्रवास करुन आलेल्या व्यक्तिंमध्ये अशी लक्षणे आढळल्यास त्याबाबत तातडीने दखल घेण्यात यावी. अशा रुग्णांनी तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल व्हावे. खासगी रुग्णालयातही अशा लक्षणांचे रुग्ण आढळल्यास त्याबाबत तातडीने सरकारी रुग्णालयास सूचित करण्यात यावे व सरकारी रुग्णालयात यासाठी सुरु असलेल्या विलगीकरण कक्षात (isolation ward) या रुग्णांना दाखल करण्यात यावे. या विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या केरळमधील कोझीकोडे व इतर परिसरातील प्रवास टाळावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
निपाह विषाणूचा प्रसार –
या विषाणुचा प्रसार मुख्यत्वे फळांवर जगणाऱ्या वटवाघळांमार्फत होतो. वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने अथवा खाल्ल्याने हा आजार होतो. डुक्कर आणि इतर पाळीव प्राणी यांना देखील याची बाधा होऊ शकते. निपा विषाणूची लागण माणसापासून माणसास होऊ शकते. रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी, रुग्णसेवा करणारे नातेवाईक यांना लागण होऊ शकते. त्यामुळे अशा रुग्णास विशेष विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक असते.
खबरदारी –
डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्ण उपचार आणि शुश्रूषा करताना जागतिक आरोग्य संघटनेच्या सार्वत्रिक खबरदारी (universal precautions) नुसार आवश्यक काळजी घ्यावी. शेतात, जंगलात अथवा इतरत्र पडलेली फळे खाणे टाळावे. निपाह विषाणू आजाराच्या रुग्णास विशेष विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे.