अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई, 16 मे 2018:
शरीरात अल्कोहोल नसल्याचा दाखला देण्यासाठी 4 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन तुकाराम वाघमारे याला निलंबित करण्यात आले आहे. महापालिकेच्या डॉक्टरला लाचप्रकरणी निलंबित करण्यात आल्यामुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
- नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक रूग्णालय, वाशी येथे कार्यरत वैद्यकिय अधिकारी डॉ. सचिन तुकाराम वाघमारे यांनी शरीरात अल्कोहोल नसल्याचा दाखला देण्यासाठी 4 हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी डॉ. सचिन तुकाराम वाघमारे यांच्याविरोधात वाशी पोलीस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा गु.र.नं. 189/2018 दाखल करण्यात आला आहे. तसेच डॉ. सचिन तुकाराम वाघमारे यांना ताब्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबई यांनी कळविले आहे.
- दरम्यान, लाच मागून महानगरपालिकेची प्रतिमा मलीन केल्याच्या गैरवर्तनाची गंभीर दखल महापालिका आयुक्त डॅा. रामास्वामी एन. यांनी घेतली असून डॉ. सचिन तुकाराम वाघमारे त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात आले आहे.
- महानगरपालिका प्रशासनामार्फत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असे नमूद करीत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी यापुढे देखील गैरप्रकार व कामात हलगर्जीपणा करणाऱ्या दोषी अधिकारी / कर्मचाऱ्यांवर तातडीने प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. पारदर्शी, लोकाभिमुख व गतिमान प्रशासन राबविण्यासाठी आपण कृतीशील असून यामध्ये नागरिकांनी देखील महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॅा. रामास्वामी एन. यांनी केले आहे.