नवी दिल्ली येथे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी पुरस्कार स्विकारला
अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई, 25 एप्रिल 2018:
नवी मुंबई महापालिकेतर्फे राबविली जाणारी ‘ऑनलाईन ई – तक्रार निवारण प्रणाली’ तसेच दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण काम करणारे ‘इ.टी.सी.’केंद्र या दोन उपक्रमांमधून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेला राष्ट्रीय हुडको पुरस्काराने (HUDCO Best practices Award 2017) सन्मानीत करण्यात आले. नवी दिल्ली येथील विशेष समारंभात हुडकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. एम. रवीकांत यांच्या हस्ते, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी राष्ट्रीय हुडको पुरस्कार स्विकारला. याप्रसंगी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ व इ.टी.सी.केंद्र संचालक डॉ.वर्षा भगत उपस्थित होते.
हुडको अर्थात हाऊसींग ॲण्ड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. या संस्थेमार्फत दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या संस्थांना सन्मानित करण्यात येते. मागील वर्षी ग्रीन बिल्डींग – गोल्ड मानांकीत नवी मुंबई महानगरापलिकेच्या आयकॉनिक नूतनमुख्यालय वास्तूस मानाचा हुडको पुरस्कार मिळाला होता.
‘ऑनलाईन ई-तक्रार निवारण प्रणाली’ मध्ये 11278 तक्रारी
सप्टेंबर 2016 पासून ‘ऑनलाईन ई-तक्रार निवारण प्रणाली’ (public grievance system) व्दारे 24 एप्रिल 2018 पर्यंत 11278 ऑनलाईन तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 98.55 टक्के तक्रारींवर 7 दिवसांच्या आत कार्यवाही करण्यात आली आहे. तक्रारदारांपैकी 5867 (52.87 टक्के) नागरिकांनी या प्रणालीविषयी आपला अभिप्राय नोंदविलेला आहे. नागरिकांच्या समाधानकारक अभिप्रायाची टक्केवारी 52.87 टक्के इतकी आहे.
योग्य वेळेत ज्या तक्रारींचा निपटारा झाला नाही त्याविषयी पूर्णत: शहनिशा करून 383 अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस या प्रणालीतील स्वयंचलित (automatic) यंत्रणेव्दारे देण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारींवरील कार्यवाहीचा नियमित विश्लेषणात्मक आढावा घेणारी व त्यानुसार बदल करणारी नवी मुंबई ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे.