सरकारचे आतून किर्तन बाहेर तमाशा सुरु

  • महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खा. अशोक चव्हाण

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई 24 एप्रिल 2018:

नाणारवासियांना फसणवीस सरकार फसवत असून नाणार रिफायनरी बाबत जे काही चालले आहे ती भाजप शिवसेनेची मॅच फिक्सिंग आहे.  दोन्ही पक्ष जनतेच्या भावनांशी खेळत असून सरकाचे आतून किर्तन बाहेर तमाशा सुरु आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

 

  • मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, नाणार गावचा औद्योगिक क्षेत्रात समावेश करणारी अधिसूचना रद्द केली असे उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणतात, तर ती अधिसुचना रद्द केली नसल्याचे मुख्यमंत्री म्हणतात. हायपॉवर कमिटी ही मंत्र्यापेक्षा मोठी नसते मात्र मुख्यमंत्र्यांनी हायपॉवर कमिटी मोठी आहे असे म्हणून आपल्या मंत्र्यांची वाईट अवस्था केली आहे. राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याला मुख्यमंत्री कवडीचीही किंमत देत नाहीत. जनाची नाही तरी मनाची थोडीशी जरी लाज असेल तर सुभाष देसाई यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि शिवसेनेने सत्तेबाहेर पडले पाहिजे असे चव्हाण म्हणाले.

 

काँग्रेस पक्ष नाणार वासियांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. नाणारवासियांच्या मर्जीविरोधात हा प्रकल्प या सरकारला रेटून नेता येणार नाही. नाणार आणि परिसराचा दौरा करून स्थानिकांशी संवाद साधून काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज आपला अहवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना सादर केला. २८ एप्रिल रोजी काँग्रेसचे एक शिष्टमंडळ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. या शिष्टमंडळासोबत नाणारवासियही खा. राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले.