हॉलमार्क असलेलेच सोन्या-चांदीचे दागिने घ्या

भारतीय मानके विभागाचे आवाहन

अविरत वाटचाल न्यूज :

मुंबई , 18 एप्रिल 2018 :

सोन्या-चांदीचे दागिने व वस्तू घेतांना परवानाधारक दुकानातून हॉलमार्क असलेले दागिने व वस्तू घ्याव्यात, असे आवाहन भारतीय मानके विभागाने केले आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आज मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी होत असते त्यामुळे या खरेदीमध्ये ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी ही काळजी घेणे आवश्यक आहे.

सोन्या-चांदीचे दागिने व वस्तू यांच्या शुद्धतेच्या पारखणीसाठी भारतीय मानके विभाग हॉलमार्क पद्धत राबवते. हॉलमार्कचे चिन्ह ग्राहकांना दागिने-वस्तूंच्या खरेपणाबाबत हमी देते. शुद्धतेबाबत, खरेपणाबाबत नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित विक्रेत्याचा भारतीय मानके विभागाचा परवाना रद्द होऊ शकतो तसेच कायदेशीर कारवाईही केली जाऊ शकते.

सोने हॉलमार्किंग संदर्भात भारतीय मानकांमध्ये भारतीय मानके विभागाने सुधारणा केली असून 1 जानेवारी 2017 पासून त्याची अंमलबजावणी सुरु आहे. हॉलमार्क असलेले 14 कॅरट, 18 कॅरट आणि 22 कॅरटचे सोन्याचे दागिनेही कॅरटच्या नोंदीसह उपलब्ध आहेत.