अविरत वाटचाल
पनवेल, 18 एप्रिल 2018:
पनवेल महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून गणेश देशमुख यांनी आज पदभार स्विकारला. याआधीचे आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याविरोधात सत्ताधारी भाजपने अविश्वासाचा ठराव मांडल्यानंतर राज्य शासनाने त्यांची तडकाफडकी बदली केली. त्यानंतर शिंदे यांच्या जागेवर गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पहिल्यांदाच महापालिकेचा दर्जा मिळाल्यानंतर पनवेलमध्ये निवडणुका पार पडल्या आणि भाजपने मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली. पनवेल महापालिकेचे पहिले आयुक्त म्हणून सुधाकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र कालांतराने सत्ताधारी भाजप आणि आयुक्त शिंदे यांच्यात वाद होऊ लागले. त्यामुळे सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर आयुक्त शिंदे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडून तो मंजूर केला आणि राज्य शासनाकडे पाठविला. त्याविरोधात अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र येत या ठारावाला विरोध केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत सामाजिक संघटनांना विश्वास देत बदली करणार नसल्याचा विश्वास दिला होता. मात्र काल अखेर शिंदे यांना आयुक्तपदावरून हटविण्यात आले होते.
गणेश देशमुख हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियुकत झालेले अ श्रेणीचे नगरविकास विभागाचे अधिकारी आहेत. नांदेड शहरातील घनकचरा व्यवस्थापन, शहर स्वच्छता याविषयी त्यांचे काम उल्लेखनीय आहे. या कामाबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांचा विशेष सत्कारही केला आहे. पनवेल महापालिकेआधी ते नांदेड महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. कल्याण, डोंबिवली, कोल्हापूर, मिरा-भाईंदर महापालिकांचे उपायुक्त म्हणून कार्यभार सांभाळला आहे.