- घणसोलीतील महापालिका शाळा क्रमांक 55 ला पहिला मान
सिद्धार्थ हरळकर/ अविरत वाटचाल न्यूज :
नवी मुंबई , 16 एप्रिल 2018 : दिवसेंदिवस विजेची वाढती मागणी लक्षात घेवून सौर उर्जेला अधिकाधिक प्राधान्य देण्याचा पर्याय नवी मुंबई महापालिकेने स्वीकारला आहे. घणसोली येथील महापालिका शाळा क्रमांक 55 राजश्री शाहू महाराज विद्यालय सौर उर्जेने झळाळून निघणार आहे. सुमारे 45 लाख रुपये खर्चून 50 केव्हीए क्षमतेचा उर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. संपूर्ण शाळेचा कारभार सौर उर्जेवर चालविण्याचा शहरातील हा बहुदा पहिलाच प्रयत्न असून कामाच्या निविदाही मागविण्यात आल्या आहेत.
अपारंपरिक उर्जा प्रकल्पांसाठी 10 कोटींची तरतूद
गेल्या काही वर्षांत उर्जेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागणीच्या तुलनेत विजेचा पुरवठा होत नसल्यामुळे अनेक वेळा सक्तीचे लोडशेडींग करण्याची पाळी येते. यापार्श्वभूमीवर अपारंपरिक उर्जा स्रोतांचा अधिकाधिक वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यादृष्टीने नवी मुंबई महापालिकेनेही कंबर कसली आहे. अपारंपरिक उर्जा प्रकल्पांसाठी महापालिकेने आपल्या अंदाजपत्रकात तब्बल 10 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील 45 लाख रुपयांचा निधी घणसोली येथील शाळेत सौर उर्जा प्रकल्प उभारण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे, असे नवी मुंबई महापालिकेच्या अधिका-यांनी सांगितले.
कामाचा तांत्रिक तपशिल
- सौर उर्जा प्रकल्पाची उपयुक्तता
घणसोली येथील महापालिका शाळेत बसविण्यात येणाऱ्या सौर उर्जा प्रकल्पामुळे शाळेतील सर्व विद्युत उपकरणे सौरउर्जेवर चालतील. तसेच हा प्रकल्प नेट मीटर पॉलिसीद्वारे एमइआरसीला जोडता येणार आहे. त्यामुळे सौरउर्जा प्रकल्पाद्वारे तयार झालेली वीज मोजून ती शाळेच्या वीज देयकातून वजा केली जाणार आहे. याशिवाय सौर उर्जेद्वारे तयार होणारी अधिकची वीज पुढील विद्युत देयकातून कपात केली जाईल. या सौरउर्जेमुळे महावितरणकडून घेण्यात येणाऱ्या विजेचा वापर कमी होवून विजेच्या बिलापोटी देण्यात येणारी रक्कम कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.