महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण
अविरत वाटचाल न्यूज
मुंबई, 14 एप्रिल 2018:
नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. शिवसेनेचा प्रकल्पाला विरोध असेल तर प्रकल्पाच्या जमीन संपादनासाठी एमआयडीसीने काढलेले परिपत्रक रद्द करावे अन्यथा सरकारमधून बाहेर पडावे असे मत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.
अशोक दादा वालम यांच्या नेतृत्वाखालील कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने आज टिळक भवन, दादर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी काँग्रेस पक्ष स्थानिकांसोबत असल्याचे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांना दिले.
नाणार रिफायनरीला स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे. काँग्रेस पक्ष स्थानिकांसोबत असून पक्षाचे शिष्टमंडळ १९ एप्रिल पासून नाणार आणि परिसराचा दौरा करून स्थानिकांशी संवाद साधणार असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नाणार रिफायनरी विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले. या प्रकल्पामुळे होणा-या प्रदूषणामुळे पर्यावरणाची गंभीर समस्या निर्माण होणार आहे अशी भिती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकल्पाविरोधात स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष असून सरकारने त्याची दखल घ्यावी. स्थानिकांचा विरोध डावलून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करू नये. स्थानिकांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेऊनच सरकारने पुढची पावले टाकावीत असे खा. चव्हाण म्हणाले.