- सार्वजनिक तेल कंपन्या आणि सौदी आर्माको कंपनीमध्ये करार
नवी दिल्ली, 11 एप्रिल 2018:
महाराष्ट्रातल्या रत्नागिरी येथे तेलशुद्धीकरण आणि पेट्रो केमिकल्स कंपनी विकसित करण्यासाठी सार्वजनिक तेल कंपन्यांची संघटना आणि सौदी आर्माको यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कंपनीत सौदी आर्माको गुंतवणूक भागीदारही राहणार आहे.
कच्च्या तेलाचा पुरवठा, स्रोत, तंत्रज्ञान, अनुभव आणि तज्ज्ञ या सर्वांची देवाणघेवाण करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.
- या तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा पूर्व अभ्यास करण्यात आला आहे. तसेच प्रकल्पाची रुपरेषा ठरवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या करारानंतर कंपनीची संयुक्त मालकी, नियंत्रण आणि व्यवस्थापन या विषयी लिखित दस्तावेज तयार केले जाणार आहेत.
- या तेलशुद्धीकरण प्रकल्पातून दररोज 1.2 दशलक्ष पिंप कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाईल. यात पेट्रोल आणि डिझेलचा समावेश असेल.
- दरवर्षी या तेलशुद्धीकरण प्रकल्पातून 18 दशलक्ष टन पेट्रोकेमिकल उत्पादनांवर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे.
- हा प्रस्तावित प्रकल्प जगातल्या सर्वात मोठ्या तेलशुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पांपैकी एक असून भारताची इंधनाची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्याची क्षमता तयार करण्यात आली आहे.
- या प्रकल्पासाठी एकूण 3 लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
या प्रकल्पामुळे रत्नागिरी आणि आसपासच्या प्रदेशात मोठी, थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला.
आयओसीएल, एचपीसीएल आणि बीपीसीएल या तीन सार्वजनिक तेल कंपन्यांच्या संघटनेनं भारतातर्फे हा करार केला आहे. तर सौदी अरेबियातर्फे सौदी आर्माकोचे अध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी अमीन नासीर यांनी हा करार केला.