उद्या मुंबईत होणार जाहीर सभा
अविरत वाटचाल न्यूज/ नवी मुंबई, 10 एप्रिल 2018:
केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार विरुध्द लोकांचे दोस्त या संघटने तर्फे भाजप विरुध्द भारतीय ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहीमेचा एक भाग म्हणून महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती दिनी उद्या ११ एप्रिल रोजी एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठी ग्रंथ संग्रहालया नजिकच्या सुरेंद्र गावस्कर सभागृह, शारदा थिएटर जवळ, दादर, (पूर्व) मुंबई येथे संध्या ६.०० वा. ही सभा होणार आहे. भाजप सरकारने मराठा समाजाची, शेतकऱ्यांची आणि भारतीयांची केलेली फसवणूक, सरकारची दलित-मुस्लिम विरोधी भूमिका, गरीबांची लूटमार, बँकाचे पैसे घेऊन विदेशात पसार होणारे देशद्रोही आदी विषयावर या सभेत चर्चा होऊन सर्वच जाती-धर्मातील भारतीयांना भाजप विरोधात एकजूटीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. मराठा, बौध्द, मुस्लिम, चर्मकार, मातंग आदी समाजातील कार्यकर्ते सभेला मार्गदर्शन करतील असेही लोकांचे दोस्त या संघटनेतर्फे प्रसिध्द करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.