सिडकोचे आवाहन
अविरत वाटचाल न्यूज/ नवी मुंबई, 9 एप्रिल 2018:
नवी मुंबईतील पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातील उपलब्ध पाणी साठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरवणे गरजेचे आहे.
पाणीपुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी सिडको क्षेत्रात 19 मार्च पासून 10 टक्के पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने सिडको क्षेत्रातील रहिवाश्यांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाताळगंगा धरण व सिडकोच्या हेटवणे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. पाण्याचा साठी पुढील वर्षीही शिल्लक राहावा यासाठी
पाणीपुरवठा कृति योजना राबविली जाते. त्याअंतर्गत पाणी कपात करण्यात आली आहे.
उन्हाळ्यात पाण्याची आवश्यकता सर्वात जास्त भासते. पाण्याच्या विनाकारण अपव्ययामुळे भविष्यात या संबंधितअनेक अडचणी येऊ शकतात. यासाठी नागरीकांनी पाण्याची बचत करणे अपेक्षित आहे. आपल्या दैनंदिन जीवनात पाणी वापरताना आपण थोडीशी काळजी घेतली तर पाण्याची मोठी बचत होऊ शकते. आपल्या राहत्या घरातील अथवा इमारत, सोसायटीमधील नळ, नळ जोडण्यांमध्ये गळती असेल तर त्याची तात्काळ दुरूस्ती करून घ्यावी. घर अथवा इमारतीतील साठवण टाकीतील पाणी वाहत राहणार नाही याची काळजी घ्यावी. शॉवर/बाथटब यांऐवजी बादली व मग घेऊन आंघोळ करावी. घरातील लादी अथवा आपले वाहन वाहत्या पाण्याने धुण्यापेक्षा छोट्या बादलीत पाणी घेऊन कपड्याने पुसावी. पाणी कधीही शिळे होत नाही. त्यामुळे आदल्या दिवशीचे साठवलेले पाणी फेकून देऊ नये. कपडे धुतल्यानंतर उरलेल्या पाण्याचा उपयोग शौचालय अथवा वाहन धुण्यासाठी करावा. आपल्या रोजच्या सवयीत पाण्याचा पुनर्वापर, पाणी बचत, जलसंवर्धन अशा प्रकरच्या संकल्पनांचा अवलंब करा. यासारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून आपण नक्कीच पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत करू शकतो.
सिडको जलवाहिनीतून पाणी गळती होत असल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधा.
नवीन पनवेल/काळुंद्रे 022-61173807, कळंबोली/नावडे 022-27421213, कामोठे 9029059751, खारघर/तळोजा9029059765, द्रोणागिरी/उलवे9029059749