मागील वर्षीच्या वृक्ष लागवडीपैकी 83 टक्के वृक्ष लागवड यशस्वी
अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई, 5 एप्रिल 2018:
मागील वर्षी झालेल्या वृक्ष लागवडीपैकी 83 टक्के वृक्ष लागवड यशस्वी झाली असून कोकण विभागात यंदा 1 कोटी 33 लाख वृक्ष लावणार येणार आहेत. झाडे लावावी आणि लावलेल्या झाडाचे संवर्धन व्हावे, ही लोकचळवळच व्हावी असे आवाहन वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी आज नवी मुंबईत केले.
सन 2018 च्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला कोकण विभागीय आयुक्त डॉ.जगदीश पाटील, कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, वन विभागाचे अधिकारी, सर्व प्रशासकीय विभागाचे प्रमुख आदि उपस्थित होते.
कोकण विभागात भौगोलिक परिस्थितीला अनुसरुनच वृक्षारोपाची निवड करावी, 30 एप्रिल पर्यंत वृक्षरोपणासाठी खड्डे घेण्याचे काम पूर्ण करावे व यावर्षीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वृक्ष रोपणाच्या कार्यक्रमात अधिकाधिक लोकसहभाग वाढावा. रानमळा ता.खेड जि.पुणे या गावातील वृक्ष लागवडीचा प्रयोग कोकण विभागात कशाप्रकारे राबविण्यात येईल यांचाही प्रयत्न करावा. कोकणातील कांदळवनाची वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करावा. वृक्षलागवडीचे व संवर्धनाचे लोकचळवळीत रुपांतर व्हावे, म्हणून वन विभागाने महाराष्ट्र हरित सेनेची स्थापना केली आहे. याला उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या चळवळीत सहभागी होण्याची संधी सर्वांसाठी उपलब्ध आहे. विभागातील सर्व शासकीय अधिकारी/कर्मचारी त्यांच कुटूंबिय, मित्र परिवार, नातेवाईक, महाविद्यालय व विद्यापीठातील विद्यार्थी यांनी हरित सेनेमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी खारगे यांनी केले. त्यासाठी http://www.greenarmy.mahaforest.gov.in या तसेच http://www.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करता येईल.
यावेळी कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर या जिल्हयातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांनी सादरीकरणाद्वारे यावर्षीच्या वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती दिली.