12 एप्रिल रोजी मतमोजणी
अविरत वाटचाल न्यूज
मुंबई, 5 एप्रिल 2018:
कणकवली (जि. सिंधुदुर्ग) व आजरा (जि. कोल्हापूर) नगरपंचायत; तसेच जामनेर (जि. जळगाव) व वैजापूर (जि. औरंगाबाद) नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या (ता. 6) होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणी मात्र 12 एप्रिल 2018 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी मुंबईत दिली.
राज्य निवडणूक आयोगाने 5 मार्च 2018 रोजी 6 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार गुहागर, देवरूख (जि. रत्नागिरी),कणकवली (जि. सिंधुदुर्ग), आजरा (जि. कोल्हापूर), जामनेर (जि. जळगाव) व वैजापूर (जि. औरंगाबाद) या नगरपरिषदा/ नगरपंचायतींसाठी 6 एप्रिल 2018 रोजी मतदान व 7 एप्रिल 2018 रोजी मतमोजणी होणार होती; परंतु न्यायालयीन निकालाच्या अनुषंगाने या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे गुहागर व देवरूख नगरपंचायतींसाठी 11 एप्रिल 2018 रोजी मतदान होईल. त्याचबरोबर कणकवली नगरपंचायतीतील प्रभाग क्र. 10 मध्ये सदस्य व अध्यक्षपदासाठी; तसेच जामनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.7 मध्ये सदस्य व अध्यक्षपदासाठी 11 एप्रिल 2018 रोजी मतदान होईल. उर्वरीत सर्व ठिकाणी उद्या (ता. 6) मतदान होत आहे.
निवडणूक कार्यक्रमातील बदलानुसार 11 एप्रिल 2018 रोजी होणाऱ्या मतदानावर प्रभाव पडू नये म्हणून या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांची संपूर्ण मतमोजणी 12 एप्रिल 2018 रोजी होईल. रत्नागिरी, आळंदी, तासगाव, दुधनी, सावदा, कुंडलवाडी व कळंब या नगरपरिषदा/ नगरपंचायतींतील प्रत्येकी एका रिक्तपदासाठीदेखील उद्या (ता. 6) मतदान होत आहे. यांची मतमोजणीही 12 एप्रिल 2018 रोजी होईल, असेही सहारिया यांनी सांगितले.
नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय एकूण जागा आणि सदस्य व अध्यक्षपदाच्या उमेदवारांची संख्या: गुहागर (17)- 47, अध्यक्ष- 3, देवरूख (17)- 62, अध्यक्ष- 5, कणकवली (17)- 59, अध्यक्ष- 4, आजरा (17)- 70, अध्यक्ष- 3, जामनेर (24)- 57, अध्यक्ष- 2 आणि वैजापूर (23)- 54, अध्यक्ष- 5.