वाहक, चालकही महिलाच असणार
नवी मुंबई, 22 मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूज:
राज्य शासनाने महिलांसाठी ‘तेजस्विनी’ बस योजना सुरू केली आहे. त्या अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमासाठी 10 तेजस्विनी बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. चालक आणि वाहक महिलाच असलेल्या या बसेस एप्रिल 2018 अखेर महानगरपालिका परिवहन उपक्रमात सामील होतील. या बससेवेमुळे गर्दीच्या वेळी महानगरपालिका क्षेत्रातील महिला प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे ठरणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सन 2018-19 चे अंदाजपत्रक सादर करताना केलेल्या निवेदनात तेजस्विनी बससेवेचा विशेष उल्लेख केला असून महाराष्ट्र राज्य शासनाने दिलेल्या मंजूरीनुसार तेजस्विनी बस योजने अंतर्गत 10 बसेस ई-निविदेमार्फत खरेदी करण्यास व शासनाच्या अटी-शर्ती नुसार बसेस परिचालनात आणण्याच्या प्रस्तावास परिवहन समितीची मंजूरीही मिळाली आहे.
या तेजस्विनी बसेस महिला प्रवाशांसाठी आरक्षित असणार असून या बसेसवरील वाहकच नव्हे तर चालकही महिलाच असणार आहे. तशा प्रकारे महिला चालक नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. या तेजस्विनी बसेस सकाळी 7.00 ते 11.00 व सायंकाळी 5.00 ते 09.00 या कालावधीत चालविण्यात येणार असून स्थानिक परिस्थिती व आवश्यकता यानुसार त्यामध्ये बदल करण्यात येतील. इतर वेळेत या बसेस नियमित असानव्यवस्थेनुसार चालविण्यात येतील.
त्याचप्रमाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यातील कालबाह्य झालेल्या सीएनजी बसेस टप्प्याटप्प्याने निर्लेखित करण्यात येणार असून त्याजागी नवीन बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. 30 मिडी 900 मिमि फ्लोअर हाईट नवीन बसेस खरेदी करण्यास 8.5 कोटी रक्कमेचा निधी महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यास महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी मान्यता दिलेली आहे. या नवीन बसेस उपक्रमाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहेत.
.