येत्या शैक्षणिक वर्षापासून पालकांनाही तक्रारीचा अधिकार
मुंबई, 20 मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूज:
राज्यातील खासगी शाळांच्या भरमसाठ फी वाढीविरोधात आता नविन शैक्षणिक वर्षांपासून पालकांनाही शुल्क नियंत्रण समितीकडे तक्रार किंवा दाद मागता येईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत केली. तक्रार करणाऱ्या पालकांची संख्या 25 टक्क्यांच्या वर असल्यास शुल्क नियंत्रण समितीने याची दखल घेऊन सुनावणी घ्यावी अशा सूचनाही व्यवस्थापनाला देण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे मुंबईसह राज्यातील कोणत्याही खाजगी शाळांना अवाजवी शुल्क आकरता येणार नाही, अशी आशा शिक्षण मंत्री तावडे त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मुंबईतील खाजगी शाळांनी अवैधपणे वाढविलेल्या फी वाढीविषयी सदस्य अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देतांना तावडे बोलत होते. खासगी शाळातील फी वाढ आणि शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती याविरोधात पालकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यांना शुल्क नियंत्रण समितीकडे दाद मागता येत नव्हती. याची दाखल घेत शासनाने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियम ) अधिनियमात सुधारणा करण्यासाठी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती व्ही. जी. पळशीकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीने अहवाल सादर केले असून शुल्क नियंत्रण समितीकडे पालकही दाद मागू शकतात. शाळा व्यवस्थापनाकडून शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांवर सक्ती केल्यास पालकांनी शुल्क नियंत्रण समितीकडे तक्रारी नोंदवाव्यात असेही तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.