आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची विधानसभेत माहिती
मुंबई, 19 मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूज:
राज्यात आतापर्यंत घेण्यात आलेल्या तीन कुष्ठरोग शोध मोहिमांच्या माध्यमातून 14 हजार कुष्ठ रोगी आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज विधानसभेत दिली.
2004 मध्ये राज्यात शून्य कुष्ठ रुग्ण आढळल्याचा अहवाल देण्यात आला होता. मात्र 2015 मध्ये नव्याने काही जिल्ह्यांमध्ये कुष्ठ रुग्ण शोध मोहिम हाती घेण्यात आली. या मोहिमेअंतर्गत 4 कोटी 59 लाख जणांची शारीरिक तपासणी करण्यात आली. त्यातील 1 लाख 64 हजार 964 या संशयित रुग्णांमधून 5 हजार 73 नवीन कुष्ठ रुग्ण आढळून आले. जानेवारी 2018 अखेर 14 हजार 287 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
यासंदर्भात सदस्य अमित देशमुख यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. कुष्ठ रुग्णांसाठी असलेला निधी त्या वर्षी खर्च झाला नाही तर तो वाया न जाता पुढच्या वर्षी वापरला जातो. नागपूर जिल्ह्यासाठी असलेला निधी वाया गेलेला नसून व्यायामाची साधने, पादत्राणे, ड्रेसरला मानधन यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. निधी वापरताना हयगय झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करु असे आरोग्य मंत्र्यांनी यावेळी सांगितले.
बुलडाणा येथील क्षयरोग रुग्णालयाचे उन्नतीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी वेगळा निधीदेखील देण्यात येईल. यावेळी झालेल्या एका उपप्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री म्हणाले, कुष्ठरोगाबाबत जाणीवजागृतीची मोहिम तीव्र करण्यात येईल. कुष्ठ रुग्णांच्या राज्यभर वसाहती आहेत. तेथे सोयीसुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. असेही त्यांनी यावेळी सांगितले.