- राष्ट्रवादीसह सहकारी सदस्यांनी मांडला प्रकृतीचा मुद्दा
मुंबई 5 मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूज:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना योग्य उपचार मिळत नसून त्यांना खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी मिळावी, अशाप्रकारची मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी आज विधान परिषदेत केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या उपचाराचा मुद्दा आज विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आला.
आमदार कपिल पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या प्रकृतीचा मुद्दा मांडला. भुजबळ आताही आमदार आहेत.जेजे रुग्णालयात तपासणीसाठी गेल्यावर त्यांना ओपीडीच्या रांगेत उभे रहावे लागते.अँजिओग्राफी,ईसीजी अबनॉर्मल आले तरी डॉक्टर त्यांना जेलमध्ये पाठवा म्हणतात. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी छगन भुजबळ यांना योग्य उपचार मिळत नाहीत असा आरोप केला . त्यांनी इतर मागासवर्गीय समाजासाठी दिलेलं योगदान पाहता या समाजाच्या भावनेचा विचार करता त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यायची परवानगी द्यावी अशी मागणी मुंडे यांनी केली.
शेकापचे आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयवंत जाधव यांनीही मुंडे आणि पाटील यांच्या भूमिकेला समर्थन दिलं. यावेळी आमदार जयंत जाधव यांनीही आपले म्हणणे मांडले.
दरम्यान सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सभागृहाला आश्वत करताना कायद्याच्या चौकटीत राहून योग्य तो निर्णय घेता येईल असं सांगितलं .सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी भुजबळ यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात येईल का याविषयी न्यायालयाला सरकार आणि संबंधित तपास संस्थांनी विचारणा करून योग्य तो निर्णय घ्यावा असे स्पष्ट केले.