- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची टीका
बीड, 16 फेब्रुवारी 2018:
राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. आठ महिने झाले अजून सर्व शेतकऱ्यांची कर्जे माफ झालेली नाहीत. बोंडअळीची मदत जाहीर करून दोन महिने झाले. अजून ती मदत मिळालेली नाही. नुकत्याच झालेल्या गारपिटीचे पंचनामेही तातडीने करायला हे सरकार तयार नाही. हे सरकार फक्त बोलण्यात ऑनलाइन आणि कामात ऑफलाइन आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
बीडच्या यशवंतराव चव्हाण चव्हाण नाट्यगृहात आज जिल्हा काँग्रेसचे शिबीर पार पडले. या शिबीराला मार्गदर्शन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली.
गेल्या चार वर्षात भाजप-शिवसेनेच्या सरकारने राज्याचा बट्ट्याबोळ केला आहे. सत्तेची मस्ती भाजप नेत्यांच्या डोक्यात गेली असून, सुशिक्षित बेरोजगारांना पकोडे विकायला सांगितले जात आहे. केंद्र आणि राज्य सरकार हुकूमशाही पध्दतीने काम करते आहे. माध्यमांची गळचेपी सुरु आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जात आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपाच्या या हुकूमशाही सरकार विरोधात जनतेत तीव्र संताप आहे, असे चव्हाण यावेळी म्हणाले.
तर अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नाही –काँग्रेस
आज सकाळी अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, खा. रजनीताई पाटील आदी नेत्यांनी बीड जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. सरकारने शेतकऱ्यांना प्रतीहेक्टरी 50 हजार रूपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली. सरकारने अधिवेशनापूर्वी मदत दिली नाही तर काँग्रेस पक्ष अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला.