- 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार
मुंबई, २५ जानेवारी२०१८/अविरत वाटचाल न्यूज:
नवी मुंबईत आयोजित निरंकारी संत समागम कार्यक्रमासाठी येणारे भाविक आणि सलग सुट्ट्या यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणाऱ्या वाशी खाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम २३ जानेवारी ऐवजी १फेब्रुवारी पासून करण्यात येणार आहे.
नवी मुंबईमध्ये २७ ते ३० जानेवारी या कालावधीत आयोजित निरंकारी संत समागम कार्यक्रमाच्या निमित्ताने सुमारे 5 लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाशी येथील खाडी पुलावरून वाढणारी वाहतुकीची वर्दळ विचारात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दुरुस्तीसाठी २३ जानेवारीपासून एका बाजूची वाहतूक बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय थोडा पुढे ढकलण्यात यावा, अशी विनंती या कार्यक्रमाच्या आयोजकांनी शासनाला केली होती. त्यानुसार व सलग येणाऱ्या सुट्ट्या यामुळे होणारी संभाव्य कोंडी टाळण्याच्या दृष्टीने पुलाच्या दुरुस्तीचे काम एका आठवड्याने पुढे ढकलण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वाशी खाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम आता १ ते २१ फेब्रुवारी या काळात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.