नवी मुंबई, 25 जानेवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज:
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या ह्ददीत 2016 पेक्षा 2017 मध्ये गुन्ह्यांचे प्रमाण 240 गुन्ह्यांनी घटले आहे. ही घट प्रामुख्याने बलात्कार, सोन साखळी चोरी, घरफोडी, चोरी, प्राणांतीक मोटार अपघात यांमध्ये झाली आहे. 2017 मध्ये घरफोडीचे 8 गुन्हे दाखल असून या आठही गुन्ह्यांची उकल झाली आहे त्यामधून 62 टक्के मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. या वर्षभरात आठ जणांवर मक्कोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज वार्षिक पत्रकार परिषदेत दिली.
2016 मध्ये 4801 गुन्हे दाखल आहेत. 2017 मध्ये 4561 गुन्हे दाखल आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत 240 गुन्हांची घट झालेली आहे. सोन साखळी चोरी प्रकरणांमध्ये 26 गुन्ह्यांनी घट झाली आहे. 2016 मध्ये 118 तर 2017 मध्ये 92 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. म्हणजेच 28 टक्के घट झाली आहे.
2017 मध्ये अमली पदार्थ विरोधात एकूण 19 गुन्ह्यांमध्ये 28 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात 54 किलो 746 ग्रॅम 56 मिलीग्रॅम अमला पदार्थ जप्त करण्यात आले. 456 ग्रॅम मेथाफेटामाईन हे केमीकल पहिल्यांदाच आंतरराज्य टोळीकडून जप्त करण्यात आले.
मोक्का कायद्याअंतर्गत 8 गुन्ह्यात कारवाई करण्यात आली. एकूण 46 जणांवर मोक्का लावण्यात आला आहे.
सन 2016 मध्ये ऑपरेशन मुस्कान अंतर्गत व स्माईल अंतर्गत 53 अपह्त बालकांचा शोध घेण्यात आला. सन 2017 मध्ये 17 बालकांचा शोध घेण्यात आला.
सायबर गुन्ह्यांमध्ये 2016 मध्ये 83 गुन्हे दाखल होते. त्यापैकी 57 गुन्हे उघडकीस आले. त्यामध्ये 106 जणांना अटक करण्यात आली आहे. सन 2017 मध्ये 72 गुन्हे दाखल होते त्यापैकी 26 गुन्हे उघडकीस आले. त्यामध्ये 105 आरोपींना अटक करण्यात आली.
9 अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 2017 मध्ये विभागीय चौकशी अंतर्गत 3 कर्मचा-यांना निष्काषित करण्यात आले. 5 अधिका-यांना काढून टाकण्यात आले आहे तर 1 कर्मचा-याला सक्तीची सेवानिवृत्ती घ्यायला लावली आहे अशा 9 अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
सध्या 24 अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 60 अधिकारी, कर्मचारी यांची प्राथमिक चौकशी सुरू आहे.
इकॉनॉमी ऑफेन्स विंग
नवी मुंबई आणि परिसरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. त्यामुळे आर्थिक फसवणुकीच्या प्रमाणातही वाढ आहे. या गुन्ह्यांची तातडीने निपटारा करण्यासाठी इकॉनॉमी ऑफेन्स विंग (eow) सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दोन विंग असणार आहेत.
व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीम
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वाशी, नेरूळ, पनवेल, न्हावाशेवा या चार पोलीस ठाण्यांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये पोलीस ठाण्यात येणा-या नागरिकांचा बेव कॅमे-यामध्ये फोटो काढला जाईल आणि त्याला दिनांक आणि वेळ यानुसार क्रमांक दिला जाईल. त्यांच्या तक्रारीची नोंद घेतली जाईल. त्यांच्या तक्रारीचे निवारण झाल्यानंतरहा त्याची नोंद घेतली जाईल.
नागरिकांच्या तक्रारींचे विनाविलंब समाधान करून प्रतिसाद देणे हा या प्रकल्पामागचा उद्देश आहे. सध्या या पथदर्शी प्रकल्प असणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास संपूर्ण नवी मुंबई परिसरात तो राबवला जाणार आहे.
आदिवासी पाडा दत्तक योजना
पनवेल पोलीस ठाण्याच्या सहा बीटमधील सहा आदिवासी पाडे दत्तक घेण्यात आले आहेत. कोंबलटेकडी, खैराटवाडी, फणसवाडी, ठाकुरवाडी, पालेवाडी, डांगरेश्वरवाडी हे आदिवासी पाडे आहेत. या पाड्यांवर 13 कुटुंबांना शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. फणसवाडी पाड्यावरील 20 विद्यार्थ्यांना पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, अमलदारांना जमवलेल्या निधीतून शैक्षणिक शिष्यवृत्ती रक्कम, प्रमाणपत्र, मानचिन्ह देण्यात आले आहेत.
दृष्टिक्षेपातील प्रकल्प
तळोजा परिसरात पोलीस ठाणे, चौकी आणि वाहतूक पोलीस चौकीकरिता जागा उपलब्ध होण्यासाठी सिडको प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सीबीडी येथील पोलीस वसाहतीची पुर्नबांधणी करण्यासाठी 5 कोटीचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. ही जागा पेलीस विबागाच्या नावाने होण्यासाठी सिडको आणि सरकारकडे पत्रव्यव्हार करण्यात आला आहे.
पनवेल येथील वाजेगांव येथे फायरिंग रेंज उभारण्यासाठी महसूल आणि वनविभाग यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
अश्विनी बिंद्रे प्रकरणात चार्जशीट दाखल करण्याची तयारी
कळंबोली पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे यांचा शोध लावण्यात अद्याप आपल्याला यश आले नसल्याची कबुली नवी मुंबई पोलीस आयुक्त नगराळे यांनी दिली. मात्र या प्रकरणातील काही महत्वाचे पुरावे हाती लावले असून कोर्टात चार्जशीट दाखल करण्याची तयारी सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.