मुंबई, 24 जानेवारी 2018 / avirat vaatchal news:
ऑनलाईन खरेदी करताना संकेतस्थळाची सत्यता पडताळून घ्यावी, सुरक्षित संकेतस्थळाचा वापर करावा. बँकेत नोंदविलेला मोबाईल क्रमांक अपडेट ठेवावा असे आवाहन बीकेसी सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल गायकवाड यांनी केले. ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्र सायबर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने सायबर सुरक्षा संदर्भात प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी पत्रकार कक्षात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गायकवाड बोलत होते. महाराष्ट्र सायबरचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सचिव विवेक भावसार, माहिती जनसंपर्कचे उपसंचालक (वृत्त) गोविंद अहंकारी, सहायक संचालक (माहिती) प्रशांत सातपुते आदी उपस्थित होते.
सध्या मोठ्या प्रमाणात सोशल नेटवर्किंग, आर्थिक व्यवहार वाढले आहेत. बँकेचे व्यवहार, ऑनलाईन शिष्यवृत्ती, करमणूक, ऑनलाईन खरेदी आदी क्षेत्रात संगणकाचे विश्व व्यापले आहे. त्यामुळे सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहेत. संगणकाच्या माध्यमातून घडणाऱ्या गुन्ह्यांना सायबर गुन्हे म्हटले जाते. वैयक्तिक वापरासाठी तसेच काहीजण इतरांना फसविण्यासाठी सायबर विश्वाचा आधार घेतात. त्यामुळे आपली माहिती सुरक्षित रहावी, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सायबर सुरक्षा महत्त्वाची आहे. तसेच वाढत्या समाज माध्यमांचा काळात सामाजिक तेढ रोखण्यासाठी, स्वतःची माहितीची चोरी रोखण्यासाठी सायबर सुरक्षेचा उपयोग होतो. फिशिंग, हॅकिंग, नोकरीची हमी दाखवून फसवणूक, वैयक्तिक ओळखीचे चोरी, एटीएम संबंधीची फसवणूक, विवाहविषयक संकेतस्थळावरून फसवणूक, सोशल नेटवर्किंग साईटवरून होणारी फसवणूक, ऑनलाईन खरेदी करताना होणारी फसवणूक आदींचा समावेश सायबर गुन्ह्यांचा समावेश होतो.
सायबर सुरक्षेसाठी
-
कोणत्याही अनोळखी लिंक किंवा ईमेल उघडू नये
-
पासवर्ड वारंवार बदलावे, अँटिव्हायरस अपडेट ठेवावेत
-
बँकेचे अथवा इतर ओटीपी कोणालाही देऊ नये, मोबाईल ॲपमध्ये पासवर्ड जमा करून ठेवू नये
-
ईमेलद्वारे अथवा कॉलच्या माध्यमातून येणाऱ्या आर्थिक आमिषाला बळी पडू नये
-
समाज माध्यमातून व्हायरल होणाऱ्या पोस्ट किंवा व्हिडिओ कोणालाही पुढे पाठवू नयेत
-
फेसबूक अथवा इतर समाजमाध्यमातून येणाऱ्या अनोळखी व्यक्तिंशी संपर्क अथवा त्यांची विनंती मान्य करू नये
-
स्वतःचे अथवा कुटुंबियांचे स्थळ, फोटो सोशल मिडियावर शेअर करू नयेत
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मध्ये तरतुदी केल्या आहेत. याद्वारे सायबर गुन्ह्यांतील दोषींना शिक्षा सुनावली जाते. सायबर गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र सायबर तर्फे 47 सायबर लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईमध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर सेलद्वारे सायबर गुन्ह्यांचा तपास करत आहोत. यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच सायबर गुन्ह्यासंदर्भात मुंबईत 982081007 व 022-26504008 ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.