2 हजारहून अधिक बाईकर्स होणार सहभागी
नवी मुंबई, 24 जानेवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज : स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत स्वच्छ नवी मुंबईचा संदेश देण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारी रोजी दिघा – ऐरोली ते सी.बी.डी. बेलापूर या भागात 2 हजारहून अधिक बाईकर्स धावणार आहेत. गिनीज बुक होल्डर मणी मंजुनाथन यांच्या नेतृत्वाखाली क्रुझ इंडिया यांच्या माध्यमातून या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या बाईक रॅलीची नोंद “गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये होणार आहे.
रॅलीचा मार्ग
सकाळी 7.30 वा. ऐरोली पश्चिम येथील पटनी ग्राऊंडवरून या बाईक रॅलीला प्रारंभ होणार असून ही बाईक रॅली दिवा कोळीवाडा चौक, राबाडे, तळवली मार्गे घणसोली एन.एम.एम.टी. डेपो समोरून कोपरखैरणे तीन टाकी मार्गे वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अरेंजा कॉर्नर पासून पामबीच मार्गाने महापालिका मुख्यालयापर्यंत येऊन पुढे गणपतशेठ तांडेल प्रदर्शनी मैदान, करावे तलावाजवळ नेरूळ याठिकाणी सकाळी 9.30 वा. या रॅलीची सांगता होणार आहे.
“माझा कचरा – माझी जबाबदारी” ही भूमिका नागरिकांच्या मनात रूजवित व “माझी नवी मुंबई – माझा अभिमान” हे घोषवाक्य प्रसारित करीत ही बाईक रॅली संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आपले नवी मुंबई शहर स्वच्छतेमध्ये देशात नंबर 1 आणण्यासाठी प्रत्येकाने सहभागी व्हावे असा संदेश दिला जाणार आहे.
या बाईक रॅलीमध्ये सहभागी होऊ इच्छिणा-या बाईकर्सनी क्रुझ इंडिया संस्थेचे प्रतिनिधी यांच्याशी 9920633039 अथवा 9920103038 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.