- 17 ते 29 जानेवारीदरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रदर्शन सुरु राहणार
मुंबई, 16 जानेवारी 2018/ avirat vatchal news:
राज्यातील बचतगटांच्या उत्पादनांना मुंबईत हक्काची बाजारपेठ आणि प्रदर्शनाची संधी उपलब्ध करुन देणारे महालक्ष्मी सरस प्रदर्शन उद्या 17 जानेवारीपासून सुरु होत आहे. हे प्रदर्शन मुंबईतील एमएमआरडीए मैदान, प्लॉट क्रमांक 19 ते 22, वांद्रे – कुर्ला संकुल, येथे 17 जानेवारी ते 29 जानेवारी या कालावधीत नागरिकांसाठी सकाळी 10 ते रात्री 10 वाजता या कालावाधीत खुले राहणार असून प्रवेश विनामूल्य असेल.
या प्रदर्शनाचे उद्घाटन व राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराचे वितरण राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते सकाळी 10.30 वा. होणार आहे, असे मंत्री पंकजा मुंडे यांनी आज पत्रकाराशी बोलताना सांगितले.
प्रदर्शनात एकूण ५११ स्टॉल, खाद्यपदार्थांचे ७० स्टॉल
- महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेल्या वस्तु, उत्पादने, साहित्य, नाविन्यपुर्ण कला व खाद्यपदार्थ सहजपणे शहरी नागरीकांपर्यत पोहचविण्यात येतात. त्यांना एक चांगली हक्काची शहरी बाजारपेठ अनुभवण्याची संधी यामाध्यमातून मिळते. महाराष्ट्रातील स्वयंसहाय्यता गटाबरोबरच जवळपास 28 राज्यांमधून विविध उत्पादने, कला घेऊन स्वयंसहाय्यता गट या प्रदर्शनीत सहभागी होणार आहेत. एकूण 511 स्टॉल उपलब्ध असणार असून त्यापैकी 70 स्टॉल विविध खाद्यपदार्थांचे असणार आहेत. यावर्षी स्वयंसहाय्यता गटांना स्टॉल वाटप ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले आहे. याशिवाय रोज सायंकाळी ग्रामीण भागातील विविध लोककलांचे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
४ हजार ६६२ बचतगटांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज
- राज्य शासनाने बचतगटांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याची महत्वाकांक्षी योजना सुरु केली असून राज्यात आतापर्यंत ४ हजार ६६२ बचतगटांना याचा लाभ झाला आहे, अशी माहितीही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली. या योजनेंतर्गत आतापर्यंत १ कोटी ५२ लाख रुपयांचे व्याज अनुदान वितरीत करण्यात आले आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.