ओटीपी, वैयक्तिक माहिती देताय… सावधान

  • ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगण्याचे तंज्ज्ञांचे आवाहन 

मुंबई, 6 जानेवारी 2018/avirat vaatchal news:

सायबर चोरीपासून वाचण्यासाठी ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कोणतीही बँक अथवा वित्तीय संस्था ईमेलद्वारे वैयक्तिक माहिती मागवित नाही. त्यामुळे लिंक पाठवून माहिती मागणाऱ्या ईमेलपासून सावध रहावे, असा सल्ला आयसीआयसीआयचे दक्षता विभागीतील उपमहाव्यवस्थापक ग्यान बराह व विभागीय व्यवस्थापक उमंग शहा, व्यवस्थापक शेखर शिंदे यांनी दिला.

महाराष्ट्र पोलीसांच्या रेझिंग डे निमित्त महाराष्ट्र सायबरच्या वतीने सायबर सुरक्षा विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन व्यवहाराकडे लोकांचा कल वाढला आहे. वस्तू मागविणे, विविध सेवांचे शुल्क अदा करणे, पैसे ट्रान्सफर करणे आदी विविध कारणांसाठी ऑनलाईनचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात सायबर चोऱ्यांचे व फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी बँकाही मोठ्या प्रमाणात सावधानता बाळगतात. परंतु, ग्राहकांनी ऑनलाइन व्यवहार करताना एटीएम कार्डवरील माहिती व त्याचा पासवर्ड कोणाला न देणे, फिशिंग ईमेलवरून मागविलेली माहिती न देणे, लॉटरी किंवा अर्ज न करता नोकरी देणारे ईमेल यापासून दूर राहणे आदी काळजी घेऊन सुरक्षित व्यवहार करावेत.

–  ग्यान बराह, आयसीआयसीआयचे दक्षता विभागीतील उपमहाव्यवस्थापक

 

  • सध्या मोबाईलवरूनही आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत. बँकांमध्ये मोबाईल क्रमांक जोडले गेल्यामुळे कोणत्याही तिऱ्हाईताला वन टाईम पासवर्ड, एटीएम पिन, किंवा मोबाईलवरून विचारण्यात आलेली माहिती देण्याचे टाळावेत. सोशल मिडियातील माहितीचा वापर करून तुमची ओळख चोरण्याचे (आयडेन्टिटी थेफ्ट) प्रकार होत आहेत. त्यामुळे फेसबुक सारख्या सोशल मिडियावर माहिती देतानाही काळजी घ्यावी, असेही बराह यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत, पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद जोशी, कॉन्स्टेबल नवनाथ देवगुडे, विवेक सावंत आदी यावेळी उपस्थित होते.