रस्त्यांवर उभ्या वाहनांवर कारवाई होणार

नवी मुंबई, 6 जानेवारी 2018/avirat vaatchal news:

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर अनेक वाहने महिनोंमहिने बंद अवस्थेत उभी आहेत. या वाहनांमुळे वाहतुकीला होणारा अडथळा तसेच कचरा साफ करणे अडचणीचे ठरत असल्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करण्यासंदर्भात महापालिकेने अंतिम नोटीसा बजावण्याचे काम सुरू केले आहे. नोटीसा मिळाल्यानंतरही न हटविल्या जाणाऱ्या वाहनांची नियमानुसार विल्हेवाट लावण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.

  • शहरात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात विनापरवानगी अनेक दिवस उभ्या असणा-या वाहनांमुळे शहर स्वच्छतेला बाधा पोहचत आहे. याबाबत महानगरपालिकेच्या वतीने अशा वाहनांच्या मालकांनी आपली वाहने हटवून घ्यावीत असे आवाहन बरेचदा केलेले आहे. मात्र अद्यापही अशी बेवारस, नादुरूस्त व अपघातग्रस्त वाहने शहरात अनेक ठिकाणी दिसून येतात.प्रशासनाने अशा वाहनांच्या मालकांनी आपल्या मालकीची रस्त्यांवर अनेक दिवस एकाच जागी उभी असलेली वाहने त्वरित हटवावीत असे अंतिम आवाहन केले आहे. याबाबत सर्व विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी आपल्या विभागीय क्षेत्रातील अशा बंद वाहनांस रितसर नोटीस चिटकवून त्याचे छायाचित्र काढावे व विहित मुदतीत संबंधित वाहन मालकाने त्या वाहनाची योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट न लावल्यास अशी वाहने टोईंगव्दारे उचलून महानगरपालिकने निश्चित केलेल्या ठिकाणी हलवावीत असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

 महानगरपालिकेकडे जमा करण्यात आलेल्या वाहनांची वाहन क्रमांकासह वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन वाहन मालकाने 3 दिवसात ही वाहने घेऊन जाण्याबाबत अतिक्रमण विभागाचे उपआयुक्तांनी सूचना प्रसिध्द करावी व त्याची प्रत प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आर.टी.ओ. कार्यालयास द्यावी असे सूचित करण्यात आले आहे. ही वाहने 3 दिवसात वाहन मालक घेऊन न गेल्यास या वाहनांचा जाहीर लिलाव करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.