मुंबई उपनगरांसाठी ‘जिल्हा आधार नोंदणी केंद्र’ 

मुंबई, 6 जानेवारी 2018/avirat vaatchal news:

आधारकार्ड अद्ययावत करणे, तपशिलात दुरुस्ती करणे या बाबींमध्ये अनेकदा नागरिकांचा बराचसा वेळ खर्ची पडतो. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, दिव्यांग यांना आधारकार्ड काढण्यासाठी रांगेत उभे राहणे त्रासदायक ठरते. यावर उपाय म्हणून मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘जिल्हा आधार नोंदणी केंद्र’ सुरु केले आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 97 लाख असून मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत स्वरुपाची लोकसंख्याही आहे. या लोकसंख्येला आधार नोंदणीसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या खासगी व्यवस्थापन संचलित आधार नोंदणी केंद्रांची संख्या कमी पडत होती. तसेच या आधार नोंदणी केंद्रांबाबत आधार नोंदणीसाठी नागरिकांकडून पैसे मागणे, अडवणूक करणे आदी तक्रारीदेखील केल्या जातात. या बाबीचा विचार करुन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांच्या संकल्पनेनुसार उपनगर जिल्हा आणि बृहन्मुंबईसाठी उपयुक्त ठरेल असे ‘जिल्हा आधार नोंदणी केंद्र’ बांद्रा येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सुरु करण्यात आले आहे.

 

‘जिल्हा आधार नोंदणी केंद्र’ मध्ये 30 आधार नोंदणी संच ठेवण्यात आले आहेत. यापैकी काही संच ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, दिव्यांग यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या 30 संचाशिवाय अतिरिक्त 5 संच राखीव ठेवण्यात आले असून त्यांचा उपयोग वयोवृद्ध, दुर्धर आजाराने ग्रस्त किंवा आधार केंद्रापर्यंत पोहोचणे शक्य नाही अशा नागरिकांसाठी ‘भरारी पथक संच’ म्हणून करण्यात येत आहे. हे केंद्र शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

  • याशिवाय नागरिकांच्या आधारसंबंधीच्या विविध स्वरुपाच्या तक्रारी, सूचनांसाठी www.aadharmumbaisuburban.com हे विशेष संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या सुविधेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.