- राज्यातील होतकरू खेळाडूंचा शोध घेणारी कब्बडी स्पर्धा
- येत्या 15 ते 21 जानेवारीदरम्यान रंगणार स्पर्धा
मुंबई, 4 जानेवारी 2018/avirat vaatchal news:
अस्सल मराठी मातीतला खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कब्बडीला आंतरराष्ट्रीय स्तरावरही नावाजले गेले आहे. जगातले अनेक देश आता कब्बडी खेळाबाबत गंभीर झाले आहेत. त्यामुळे प्रो कबड्डीला राज्यातून दमदार-जोरदार खेळाडू मिळावेत, प्रो कबड्डीमध्ये मराठी मुलांना संधी मिळावी आणि होतकरू खेळाडूंचा शोध घेण्यासाठी येत्या 15 ते 21जानेवारीदरम्यान अभिनव कलाक्रीडा अकादमी आणि ओएच मिडियाच्या आयोजनाखाली कांदिवलीच्या चारकोप येथील विशाल सह्याद्री क्रीडानगरीत कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महामुंबई कबड्डी लीगच्या बोधचिन्हाचे औपचारिक उद्घाटन करताना स्पर्धेच्या सहा संघाच्या कर्णधारांचीही ओळख करून देण्यात आली. लवकरच सहा संघाच्या नावांची घोषणा करण्यात येणार असून राजू लोहार, आरिफ सय्यद, हरिदास भायदे, रोहित जाधव, शैलेश गारले आणि नामदेव इस्वलकर यांच्याकडे नेतृत्व सोपविण्यात आले. या कार्यक्रमाला स्पर्धेचे संयोजक आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते रवि करमरकर, हनुमंत सावंत, दिपक जाधव, दत्ता पाटील, सुनील देसाई आणि सुनील सुवर्णा हे कबड्डीचे संघटक उपस्थित होते. या लीगला प्रो कबड्डी स्टार रोहित कुमार आणि सिनेस्टार सुनील बर्वे हे ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून लाभले आहेत.
1200 खेळाडूंमधून संघांची निवड
- प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर खेळवल्या जाणाऱ्या महामुंबई कबड्डीच्या सहा संघांची निवडही 1200 खेळाडूंच्या चाचणी स्पर्धेतून केली गेली.
- या चाचणीसाठी मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबईतून खेळाडू आले होते.त्यातून 100 खेळाडूंची निवड करण्यात आली.
- या निवडलेल्या खेळाडूंमधूनच 12 खेळाडूंचे सहा संघ तयार केले जातील आणि उर्वरित खेळाडूंना राखीव ठेवले जाईल.
- प्रत्येक संघात 9 स्थानिक आणि 3 अन्य जिल्हयातील खेळाडूंची निवड करता येईल. प्रो कबड्डीप्रमाणे महामुंबई कबड्डीतही संघाचे मालक असतील. तेच खेळाडूंचा सर्व खर्च उचलतील.
- या स्पर्धेच्या तयारीसाठी 7 दिवसांचे सराव शिबीरही आयोजित केले जाणार आहे.
- या शिबीरात खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक कबड्डी दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे.
- ही स्पर्धा साखळी आणि बाद फेरीत खेळली जाणार असून एकूण 17 सामने खेळले जातील.
- गटात अव्वल राहणाऱ्या पहिल्या दोन संघांमध्ये महामुंबई कबड्डी लीगचा अंतिम सामना खेळला जाईल
- तिसऱ्या क्रमांकासाठी गटातील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांमध्ये झुंज रंगेल.
लाखोंची बक्षीसे, सर्वोत्तम खेळाडूंना दुचाकी
- विजेत्याला एक लाखांच्या रोख पुरस्काराने गौरविले जाईल.
- उपविजेत्या संघाला पाऊण लाखांचे इनाम देण्यात येईल.
- स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंना दुचाकीने सन्मानित केले जाईल.