प्रशासनाने योग्य खबरदारी न घेतल्याने हा प्रकार घडला-शरद पवार

मुंबई, 2 जानेवारी 2018/avirat vaatchal news:

भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काही हिंदूत्ववादी संघटनांनी पुणे शहरात येवून ३-४ दिवसापासून चिथावणी देण्याची भूमिका घेतली होती असे तिथले लोक सांगत आहेत. त्यामुळे आधीपासूनच इथे अस्वस्थतेचे वातावरण होते. भीमा कोरेगाव येथे लाखोच्या संख्येने लोक येणार हे माहित असताना यंत्रणेने खबरदारी घ्यायला हवी होती. ती प्रशासनाने न घेतल्यामुळे अफवा आणि गैरसमज अधिक पसरल्यामुळे हा प्रकार घडल्याचे शरद पवार म्हणाले.

याठिकाणी नांदेड जिल्हयातील एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. पोलिसांनी याबाबतीत लगेच काळजी घेतली ते बरं झालं. हे प्रकरण चिघळू दयायला नको. जे घडले त्याची चौकशी राज्यसरकारने करावी. घडलेला प्रकार शोभनीय नाही त्यामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी सामंजस्य आणि संयमाने कोणतेही प्रक्षोभक भाष्य न करता परिस्थिती हाताळणे आवश्यक आहे असेही शरद पवार म्हणाले.

 

समाजविघातक शक्तींचा कुटील राजकीय डाव हाणून पाडा खा. अशोक चव्हाण

भिमा कोरेगाव येथे काल घडलेली घटना दुर्देवी असून काँग्रेस पक्ष या घटनेचा तीव्र निषेध करित आहे.  अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता आणि संयम राखून समाजात फूट पाडणा-या समाजविघातक शक्तींचा हा कुटील राजकीय डाव हाणून पाडावा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.

दलित आणि मराठा समाजात भांडणे लावून त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा काही समाघविघातक प्रवृत्तीचा डाव असल्याचे कालच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेला मानणा-या सर्वांनी एकत्र येऊन लोकशाही मार्गाने लढा देऊन हा कुटील राजकीय डाव हाणून पाडण्याची आवश्यकता आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.