- राज्यभरात 134 एसटी बसची तोडफोड
मुंबई, 2 जानेवारी 2018 /avirat vaatchal news:
भीमा कोरेगाव, सणसवाडी परिसरात झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेचे तीव्र पडसाद आज मुंबईसह राज्याच्या अनेत भागांत उमटले. मुंबईत अनेक ठिकाणी रास्तारोको झाल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. दगडफेक आणि जाळपोळीदरम्यान राज्यभरात 134 एसटी बसची तोडफोड करण्यात आल्याचे एसटी प्रशासनाने कळविले आहे. या हिंसाचाराच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाने उद्या बुधवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. दरम्यान, नागरिकांनी याप्रकरणात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
भीमा कोरेगावच्या विजयदिनाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्याचा कार्यक्रम सोमवारी सुरू होता. त्यावेळी अज्ञात व्यक्तींनी रस्त्यांवरील वाहनांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली होती. या दगडफेकीत अनेकजण जखमी झाले. यावेळी पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले असून मंगळवारी मुंबईसह अनेक भागात रास्तारोको तसेच गाड्यांवर दगडफेकीचे प्रकार घडले.
भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ मुंबईतील हार्बर मार्गावर चेंबर, गोवंडी परिसरात आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. या आंदोलनामुळे हार्बर सेवाही ठप्प पडली होती. पाचच्या सुमारास हार्बर सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. तर मेन आणि ट्रान्सहार्बर मार्गावरची सेवा सुरळीत सुरू होती, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले.