कारवाई न केल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा
नवी मुंबई, 18 डिसेंबर 2017/ avirat vaatchal news:
सीवूडस् सेक्टर -४८(अ) येथील सोसायट्यांबाहेर अनधिकृतपणे वाहनांचे पार्किंग केले जात आहे. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असणा-या या वाहनांमुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या अनधिकृत पार्किंग विरोधात योग्य कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. या बाबत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा मनसेच्या वतीने वाहतूक पोलीसांना दिलेला निवेदनातून देण्यात आला आहे.
सेक्टर -४८ येथील सहयोग, आदर्श, राजगड, निसर्ग या सोसायटीकडे जाणारा रस्ता अरुंद आहे. रात्री या रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृतपणे वाहने उभी केली जातात. आपतकालीन परिस्थीत या सोसायट्यांकडे जाणारा मार्ग बंद होतो. याविरोधात येथील रहिवाशांनी मनसे कडे तक्रार केली होती. नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी वाहतूक पोलीस उपायुक्त नितीन पवार आणि गायमुख चौकीतील पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांना या अनधिकृत पार्किंग विरोधात योग्य कारवाई करावी या मागणीचे पत्र नुकतेच देण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी मनसे शिष्टमंडळाबरोबर रस्त्याची पाहणी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
मनसेच्या या शिष्टमंडळात महिला सेना उपशहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, विभाग अध्यक्ष सचिन कदम, शुभांगी विचारे, उप विभाग अध्यक्ष स्वप्निल गाडगे, शाखा अध्यक्ष अप्पासाहेब जाधव, मनविसे विभाग अध्यक्ष अशोक कांबळे, शाखा अध्यक्ष तेजस माने, दत्ता खिलारी आणि तक्रारदार नागरिक उपस्थित होते.