जालिंदर यादव यांचा नागरी सत्कार 

ठाणे, 11  डिसेंबर 2017/avirat vaatchal news:

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत तथा माझगाव डॉकचे माजी उपमहाप्रबंधक जालिंदर (जे. जी. ) यादव यांचा ठाणे येथे रविवारी नागरी सत्कार करण्यात आला. जालिंदर यादव नुकतेच माझगाव डॉकमधून प्रदिर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. त्यांच्या नागरी सत्काराला ठाणे, मुंबई, नवी मुंबई तसेच आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.

जालिंदर यादव हे ठाणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील एक मोठे नाव आहे. शहरातील आंबेडकरी समाजाच्या विविध कार्यक्रमांसाठी त्यांचे मोठे योगदान आहे. 30 नोव्हेंबर 2017  रोजी ते माझगाव डॉकच्या शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबईच्या महाप्रबंधक (प्रशासन)  या पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीनंतर चळवळीसाठी पूर्णवेळ कार्यरत राहण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला आहे. त्यांच्या आंबेडकरी चळवळीतील योगदान आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यामुळे त्यांचा लोकसंचय दांडगा आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थान माजी न्यायाधीश गुलाबराव अवसरमोल तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे आणि माजी पोलीस उपायुक्त सुरेश सूर्यवंशी उपस्थित  होते. याशिवाय मधू मोहिते, सायन रुग्णालयाचे समाज विकास अधिकारी डॉ. प्रकाश गायकवाड, माझगाव डॉकचे मुख्य व्यवस्थापक नामदेव आवाड, माजी पोलीस उपायुक्त विजय परकाळे,  सुनील कदम, काँग्रेसचे नेते सुखदेव उबाळे, सुरेंद्र शिंदे, भिवंडीचे नगरसेवक तथा रिपाइं एकतावादीचे प्रदेशाध्यक्ष विकास निकम , उत्तमराव खडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

गेली कित्येक दशके मी आंबेडकरी चळवळीत सक्रीय काम करीत आहे. माझगाव डॉकमध्ये उपमहाप्रबंधक पदावर काम करीत असताना खूप जबाबदारी होती. मात्र सामाजिक बांधिलकीतून लोकांना शक्य होईल, तेवढी मदत करण्यावर भर दिला. आता निवृत्तीनंतर पूर्ण वेळ सामाजिक चळवळीत काम करणार आहे.

-जालिंदर (जे. जी. ) यादव