नवी मुंबईत 12 ठिकाणी आधार कार्ड केंद्रे सुरू

 

नवी मुंबई, 7 डिसेंबर 2017/Avirat Vaatchal News :

भारतीय नागरिकत्वाची ओळख असणारे आधार कार्ड प्रत्येक नागरिकाकडे असणे गरजेचे झाले आहे. यापार्श्वभूमीवर नवी मुंबईतील नागरिकांना सुलभतेने आधार कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालयांत  आधार कार्ड केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालयांप्रमाणेच सी.बी.डी. बेलापूर येथील मुख्यालय इमारत तसेच महिला सक्षमीकरण केंद्र सेक्टर  घणसोली, नेरूळ विभाग कार्यालयाची सेक्टर 3 येथील जूनी इमारत त्याचप्रमाणे एमएसईडीसी कार्यालय व रेशनींग कार्यालयाच्या परिसरातील सेक्टर 1 वाशी येथील नागरी आरोग्य केंद्राची इमारत अशा इतर 4 ठिकाणी अशा एकूण 12 ठिकाणी ही आधार कार्ड केंद्रे सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यापैकी वाशी, घणसोली व दिघा विभाग कार्यालयातील आधार कार्ड केंद्रे आता सुरू झाली आहेत. येत्या आठवड्याभरात इतर ठिकाणचीही आधार कार्ड केंद्रे कार्यान्वित करण्यात येत आहेत.

महाराष्ट्र शासनाचा माहिती तंत्रज्ञान विभाग व ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय यांचेमार्फत प्राप्त सूचनांनुसार आधार कार्डचे अद्ययावतीकरण करणे व नवीन नोंदणी करणे विषयक ही आधार कार्ड केंद्रे नागरिकांच्या सोयीकरिता सुरू करण्यात येत आहेत.

  • नवीन आधार कार्ड नोंदणी विनामूल्य केली जाणार असून नोंदीत आधार कार्डमध्ये नाव, पत्ता वा इतर काही बदल करावयाचा असल्यास 25 रुपये आणि जीएसटी इतके मूल्य भरावे लागणार आहे.

 

  • आधार कार्डची रंगीत प्रिंट हवी असल्यास  20 रुपये आणि जीएसटी तसेच कृष्णधवल प्रिंटसाठी 10 रुपये आणि जीएसटी असे मूल्य आकारण्यात येणार आहे.

आधार कार्डपासून वंचित असलेल्या नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत प्रत्येक विभागात आधार कार्ड केंद्रे सुरू करण्यात येत असून नागरिकांनी त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.