मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, 6 डिसेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:
राज्यात उद्योग वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांची, दळणवळणांच्या साधनांची पायाभरणी झाली असून, ट्रान्सहार्बर लिंकचे काम येत्या साडे चार वर्षात पूर्ण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिली. अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स इन इंडिया यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
नवी मुंबई विमानतळाच प्राथमिक विकासपूर्व कामांची सुरुवात झाली आहे. डिसेंबर 2019 पर्यंत पहिले टर्मिलन आणि एक रनवे तयार होईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मेट्रोच्या जाळ्यामुळे येत्या पाच वर्षात मुंबईकरांसाठी दुप्पट वाहतुक क्षमता निर्माण होणार आहे.
शहर विकासासह ग्रामीण भागाच्या विकासासाठी विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे. ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी 1 हजार गावांमधून काम सुरु आहे. यासाठी राज्य शासनाने स्वयंसेवा संस्थेमार्फत तिनशे युवकांना दोन वर्षांसाठी करारबद्ध केले आहे. त्याचप्रमाणे बहुविध लोकपयोगी कार्य शासनाच्या सहयोगाने करण्यासाठी विविध खासगी संस्थांच्या समवेत आज 32 सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या शिवाय ज्या कार्पोरेट संस्था किंवा व्यक्तींना शासनाच्या सहयोगाने सामाजिक कार्य करावयाचे आहे त्यांच्यासाठी ‘सहयोग’ हा डिजीटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत अधिकाधिक लोकांनी सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स इन इंडिया अंतर्गत राज्यात बॅंकींग, ऑटोमोबाईल, तंत्रज्ञान, आणि इतर महत्वपुर्ण क्षेत्रात गुंतवणूक करण्यात आली आहे. राज्यातील इज ऑफ डुइंग बिजनेस अंतर्गत या कंपन्यांना राज्यात उद्योग उभारणी करण्यात सहकार्य मिळाले आहे असे शिष्टमंडळाने आवर्जून नमुद केले.