पावणे दोन कोटींचा मुद्देमाल हस्तगत
नवी मुंबई, 5 डिसेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:
जुईनगर येथील बँक ऑफ बडोद्याच्या शाखेत भुयार खणून घातलेल्या दरोडाप्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 1 कोटी 51 लाखांचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने असा पावणे दोन कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये 5 हजार 523 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 412 किलो वजनाच्या चांदीचाही समावेश आहे.
जुईनगर सेक्टर 11 येथील भक्ती रेसिडेन्सी या सोसायटी खाली बँक ऑफ बडोदाची जुईनगर शाखा आहे. 13 नोव्हेंबर रोजी लॉकर उघडण्यासाठी गेलेल्या एका ग्राहकाला बॅंकेतील लॉकर्स तोडल्याचं दिसून आलं होतं. शेजारील दुकानातून जवळपास 30 फूट लांब भुयार खणून बॅंकेतील 237 लॉकर पैकी 30 लॉकर्समधील मुद्देमालाची चोरी करण्यात आली होती.
याप्रकरणाचा तपास करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांची दहा पथकं तयार करण्यात आली होती. ही पथके मालेगाव, मुंबई सह उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथेही रवाना झाली होती. या पथकांनी 3 कोटी 43 लाख 42 हजार 825 किमतीचे सोने,चांदीचे दागिने व रोख रक्कम पैकी 1 कोटी 38 लाख 5 हजार 825 किमतीचे 5 हजार 523 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व लगड तसेच 12 लाख 19 हजार 233 रूपयांची रोख रक्कम, 1 लाख 23 हजार 843 रूपये किमतीची 412 किलो वजनाची चांदी अशी 1 कोटी 51 लाख 48 हजार 901 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या दरोड्यातील मुख्य आरोपी हाजीद अली मिर्झा बेग, श्रावण हेगडे, मोमीन खान, अंजन महांती उर्फ रंजन या चौघांना 18 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. अधिक चौकशीत त्यांनी मालेगाव येथील सोनार राजेंद्र वाघ याला दागिने विकल्याचे सांगितले. त्यानुसार वाघ याला मालेगाव येथून 20 नोव्हेंपर रोजी अटक करण्यात आली. मोईद्दीन उर्फ मेसू याला पालघर येथून , शहनाजबी मोईद्दीन शेख याला कोलकाता हावडा येथून तर कमलेश वर्मा , शुभम निशाद या दोघांना इलाहाबाद येथून, तर जुम्मन शेख आणि मेहरूनिस्सा मिर्झा या दोघांना मुंबईतून अटक करण्यात आली. दरम्यान दुकान भाड्याने घेणार गेना बच्चन या आरोपीचा उदयपूर, राजस्थान येथे आजाराने निधन झाल्याचे उघड झाले.
या आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहितीही आयुक्त नगराळे यांनी यावेळी दिली.