मुंबई, 4 डिसेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:
वाहनाचे फिटनेस सर्टीफिकेट मिळवण्यासाठी असलेली अट शिथिल करण्यात आली आहे. वाहनाची नोंदणी ज्या आरटीओ कार्यालयात केली तिथेच फिटनेस प्रमाणपत्र मिळविण्याची असलेली ही अट शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे इतर आरटीओ कार्यालयातून किंवा फिटनेस प्रमाणपत्राची मुदत संपल्याच्या तारखेला संबंधीत वाहन जिथे प्रवास करीत असेल त्या क्षेत्रातील आरटीओ कार्यालयातून हे प्रमाणपत्र मिळविण्याची मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- फिटनेस प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्याने वाहनधारकांची (विशेषत: मालवाहू वाहनांची) होणारी गैरसोय, त्याचा जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतुकीवर होणारा परिणाम, त्यातून निर्माण होणारी महागाई, भाजीपाला- अन्नधान्याचा तुटवडा आदी विविध समस्या टाळण्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.
- केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक विभागाने आंतरराज्य प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी असा निर्णय घेतला आहे. हाच निर्णय राज्यात आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी घेण्याचा विचार होता. याबाबत आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या निर्णयानुसार आता वाहनधारकाने ज्या जिल्ह्यात नोंदणी केली त्या जिल्ह्यात फिटनेस प्रमाणपत्रासाठी प्रतिक्षायादी मोठी असल्यास संबंधीत वाहनधारकाला नजिकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून फिटनेस प्रमाणपत्र मिळविता येणार आहे. तसेच फिटनेस प्रमाणपत्राची मुदत संपण्याच्या काळात संबंधीत वाहन जर दुसऱ्या आरटीओ क्षेत्रात प्रवास करीत असेल तर ते ज्या आरटीओ क्षेत्रात आहे तिथेच त्याला फिटनेस प्रमाणपत्र मिळविता येऊ शकेल. राज्यातील अनेक वाहनधारकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. फिटनेस प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेतील विलंब आणि गैरव्यवहार यामुळे टळणार आहे,असे रावते यांनी स्पष्ट केले.
- हे प्रमाणपत्र देताना उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार त्यातील अटी व शर्ती पाळून देण्यात येणार आहे.